महानवमीला हजारो कोळी बांधवांनी घेतले कार्ला एकवीरा मातेचे दर्शन
तहसील प्रशासनाने केले उत्तम नियोजन
लोणावळा : तमाम कोळी, आगरी बांधवांचे कुलदैवत असणार्या कार्ला गडावरील एकवीरा देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गुरुवारी महानवमीच्या दिवशी प्रशासनाच्यावतीने कार्ला गडावर पहाटे होमहवन आणि देवीचा अभिषेक करण्यात आला. यावेळी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्या माळेपासून संपूर्ण नवरात्र काळात एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील विविध भागातुन भाविक लाखोंच्या संख्येने येत असतात. मात्र त्यातही महानवमीच्या दिवशी होमामध्ये आहुती देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी याठिकाणी होत असते. एकविरा मंदिर ट्रस्टचा कारभार न्यायालय नियुक्त प्रशासनाच्या हाती गेल्यानंतर यंदा पहिल्यांदाच प्रशासनाच्या वतीने गडावर विविध धार्मीक कार्यक्रम आणि होमहवन केलं गेलं. गुरुवारी सकाळी पहाटे चार वाजता धर्मदाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते देवीला अभिषेक करण्यात आला. अभिषेका नंतर मंत्रघोषात होमहवन करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी होमामध्ये नारळ आणि समिध्या अर्पण केल्या.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
यावेळी सहाय्यक धर्मदाय आयुक्त राहुल चव्हाण, तहसीलदार रणजित देसाई, लोणावळा ग्रामीण पो.नि. रामदास इंगवले, धर्मदाय आयुक्तालय निरीक्षक के.डी.महाले, प्रदिप वि.खंडागळे, मंडल अधिकारी माणीक साबळे, गुरव प्रतिनिधी संतोष अरूण देशमुख, पोलीस पाटील अनिल पडवळ, नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, संजय गोविलकर, रमेश जाधव, राजेश सावंत, प्रकाश पोरवाल आदींसह उपस्थित होते. यंदा महानवमी आणि दसरा एकत्र आल्याने हे औचित्य साधत गडावर भाविकांची गर्दी पाहता पोलीस जिल्हा प्रशासनाच्यावतीने बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
स्वच्छतेबाबत केली जनजागृती
दरवर्षी शारदीय नवरात्रौत्सवामध्ये कार्ला गडावर विश्वस्तांच्यावतीने गडावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. यावर्षी विश्वस्तांच्या वादामध्ये मोठा निर्माण झाला आहे. त्यामुुळे धर्मदाय आयुक्तालयाने तहसिलदारांवर गडाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे संपूर्ण नवरात्र उत्सावात तहसिलदार व त्यांच्या प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी हा उत्सव अत्यंत शांततेत पार पाडला. यावर्षी गडावर सर्वत्र स्वच्छ अभियानाबाबत येणार्या भाविकांना जनजागृती करण्यात आली.