पिंपरी चिंचवड – भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या महाराष्ट्र सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील गड – किल्ले भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तात्काळ मागे घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी व समविचारी पक्ष -सामाजिक संघटना यांच्या वतीने पिंपरी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करून भाजपा सेना युती सरकारचा निषेध करून मुख्यमंत्री देवेंद्र डणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने मुर्दाबाद घोषणा देण्यात आल्या. यावेळी, महिलांच्या वतीने जोडो मारो आंदोलन करून मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयाच्या प्रतिची सार्वजनिक होळी करण्यात आली. दरम्यान याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेले मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, मनसेचे सचिन चिखले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जीवन बोराडे, समाजवादी पार्टीचे रफिक कुरेशी, लोकजनशक्ति पार्टीचे धुराजी शिंदे, शेकापचे नाना फुगे, आपचे प्रकाश पठारे, एमआयएमचे धम्मराज साळवे, राष्ट्रवादीचे विशाल जाधव, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश गायकवाड, छावा संघटनेचे धनाजी येळकर, संभाजी ब्रिगेडचे विशाल तुळवे, अपना वतनचे सिद्दीक शेख व नागरी हक्क सुरक्षा समितीचे गिरीष वाघमारे यांनी निषेधपर मनोगत व्यक्त केले.
मानव कांबळे म्हणाले की, या जातीयवादी सरकारने गड – किल्ले हेरिटेज हॉटेल व लग्न समारंभासाठीच्या कार्यक्रमांसाठी भाडेतत्वावर देण्याचा घेतलेला निर्णय शिवस्वराज्याच्या विरोधात केलेला द्रोह आहे. येथील रयत हा निर्णय कदापि मान्य करणार नसून हा निर्णय त्यांना तात्काळ मागे घ्यावाच लागेल. या पुढच्या निवडणूकीत असल्या छत्रपती शिवारायांच्या विचार विरोधातील जुलमी सरकारला घरी बसवल्याशिवाय जनता शांत बसणार नसल्याचे प्रतिपादन केले. तसेच आंदोलन प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी मागील ५ वर्षात भाजपा सेना युतीच्या भ्रष्टाचारी सरकारचा पर्दापाश केला. असल्या जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या सरकारला पाय उतार होण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सतिश काळे, राजेंद्र देवकर, सागर तापकीर, नीरज कडू, लहुजी लांडगे, रशिद सय्यद, सतिश कदम, गिरीधर लढढा, दिलीप काकडे, छाया देसले, आश्विनी बांगर, रूहिना शेख उपस्थित होत्या.