पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेनेसमोर गड राखण्याचे आव्हान

0

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणाचे सखोल विश्लेषण

राष्ट्रवादीकडून दिलीप वाघ पुन्हा टक्कर देण्याच्या तयारीत

चेतन साखरे, जळगावः जिल्ह्याच्या राजकारणात दिग्गजांचा मतदारसंघ म्हणून पाचोरा-भडगाव मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघाचे स्व. सुपडू भादु पाटील, के.एम.बापू पाटी, स्व. ओंकारआप्पा वाघ, स्व. आर.ओ तात्या पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. आता या मतदारसंघात स्व. आर.ओ. तात्यांचे पुतणे किशोर पाटील हे विद्यमान आमदार आहेत. गत विधानसभा निवडणुकीत दिलीप वाघ यांचा पराभव करून किशोर पाटील विजयी झाले होते. या मतदारसंघात भाजपा विरूध्द शिवसेना असा संघर्ष बघायला मिळाला आहे. तसेच भाजपाकडून या मतदारसंघासाठी मुलाखती देखिल झाल्या असुन भाजपातील इच्छुकांसह राष्ट्रवादीचे माजी आ. दिलीप वाघ यांनी देखिल विधानसभेसाठी कंबर कसली असल्याने हा गड राखण्याचे आव्हान शिवसेनेसमोर उभे ठाकले आहे.

पाचोरा-भडगाव मतदारसंघात गेल्या पाच वर्षात आमदार किशोर पाटील यांनी मोठी ताकद निर्माण केली आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून आमदार किशोर पाटील यांनी हा मतदारसंघ काबीज केला आहे. या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य असले तरी या मतदारसंघातून स्व. आर.ओ. तात्या पाटील हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यांच्यानंतर आता किशोर पाटील हे आमदार झालेत. सामाजिक गणित लक्षात घेतले असता राजपूत समाज जवळपास 20 हजार, बंजारा समाज 15000, अनुसुचित जाती जमाती 30000, मुस्लीम समाज 50000, परदेशी समाज 17000 अशी लोकसंख्या आहे. तसेच या मतदारसंघात 3 लाख 12 हजार 962 मतदार असून त्यात 1 लाख 63 हजार 262 पुरूष, स्त्री 1 लाख 49 हजार 698, इतर 2 असे मतदार आहेत. नव्याने झालेल्या मोहीमेत या मतदारसंघातही मतदारांची संख्या वाढली आहे.

जिल्हा परिषद गट आणि पं.स.गणातही शिवसेनेचे वर्चस्व
या मतदारसंघात जिल्हा परीषदेचे पाच गट, पंचायत समितीचे 10 गण तर 100 ग्रामपंचायती आहेत. या सर्व ठिकाणी शिवसेनेचे मोठे वर्चस्व आहेत. शिवसेनेकडे 52 ग्रामपंचायती, राष्ट्रवादीकडे 30, भाजपा 12 तर काँग्रेसकडे 6 ग्रामपंचायती ताब्यात आहेत. ग्रामीण भागात शिवसेनेचे जाळे विणण्यात आमदार किशोर पाटील यांना यश आले असले तरी गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादीने देखिल मतदारसंघातील विविध प्रश्‍नांच्या माध्यमातुन आपला संपर्क वाढविला आहे. तसेच भाजपाचे डॉ. संजीव पाटील, डी.एम.पाटील, अमोल शिंदे, उत्तमराव महाजन, मधुकर काटे, सुभाष पाटील, डॉ. अस्मिता पाटील यांनीही संपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेची धाकधुक वाढविली आहे. मात्र युती झाल्यास आणि ही जागा शिवसेनेकडे राहील्यास ही धाकधुक कमी होईल.

लोकसभेला भाजपाला सर्वाधिक लिड
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील यांना सर्वाधिक लिड पाचोरा-भडगाव मतदारसंघाने दिला आहे. या निवडणुकीच्या निमीत्ताने देखिल शिवसेनेने विधानसभेची पेरणी केली.

मतदारसंघातील प्रश्‍न जैसे थे
गेल्या पाच वर्षात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी पाचशे कोटीहून अधिक विकासकामे केल्याचा दावा केला असला तरी उतावळीचे पाणी बहुळा धरणात आणणे, बेरोजगारीचा प्रश्‍न, पाणी टंचाई, औद्योगिकीकरण यासारखे प्रश्‍न आजही जैसे थेच आहे. हे मुद्दे म्हणजे विरोधकांच्या हातात आयते कोलीतच म्हणावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीतही हे मुद्दे तापण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीला कठोर परिश्रमाची गरज
शिवसेनेचे पारंपारिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादीकडुनही निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ हे भाजपामध्ये जाता-जाता राहीले. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे. कारण राष्ट्रवादीतुन काही पदाधिकारी हे शिवसेनेत गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संघटन डगमगले आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांना मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. मतदारांमध्ये जाऊन सरकारविषयीचा असलेला असंतोष मतपेटीच्या माध्यमातून प्रकट करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर भाजपातील इच्छुकांसह राष्ट्रवादीचे देखील आव्हान राहणार आहे.

गत निवडणुकीत मिळालेली मते
सन 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या दिलीप वाघ यांना पराभूत करून शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे विधानसभेत गेले होते. त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
किशोर धनसिंग पाटील – 87520 (46.15 टक्के मते)
दिलीप ओंकार वाघ – 59117 (31.17 टक्के)
उत्तमराव धना महाजन – 20772 (10.95 टक्के )