गड संवर्धनाच्या कामासाठी तिकोना गडावरील बालेकिल्ल्यावर प्रवेश बंद – गणेश जाधव

0

थंडीमुळे विविध संस्था, महाविद्यालये, शाळा, एन.एस.एस. आदींच्यावतीने ट्रेकींग तसेच ट्रीपचे केले जाते आयोजन

लोणावळा : तिकोणा गडावरील बालेकिल्ल्यावर जाणार्‍या पायर्‍यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हे दुरुस्तीचे काम संपेपर्यंत गडप्रेमींना गडावरील बालेकिल्ल्यावर जाता येणार नाही. हे काम सुरू असताना केवळ गडावरील तळजाई माता मंदिरापर्यंतच गडप्रेमींना जाता येणार आहे, अशी माहिती गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे पदाधिकारी गणेश जाधव यांनी दिली. थंडीचा मोसम सुरू झाला आहे. धुके आणि थंडीमुळे विविध संस्था, महाविद्यालये, शाळा, एन.एस.एस. आदींच्यावतीने ट्रेकींग आणि ट्रीपचे आयोजन केले जाते. त्यामुळे सध्या तरी ट्रेकिंगसाठी हा गड बंद आहे. दुरूस्तीनंतर तो लवकरच सुरू होणार आहे.

गडसंवर्धनाचे काम सुरू

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले तिकोणा गडावर गडसंवर्धनाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातील पहिला व मोठा टप्पा म्हणजे बालेकिल्ल्यावर जाणार्‍या पायर्‍यांच्या दुरुस्तीचे काम मंगळवार पासून प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे. पुढील काही दिवस हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे तिकोणा गडाला भेट देणार्‍या गडप्रेमींना बालेकिल्ल्यावर जाता येणार नाही.
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ यांच्या प्रयत्नातुन तिकोणा गडावर वेळोवेळी दुर्गसंवर्धनाचे काम केले जाते. तसेच इतरही काही किरकोळ दुरूस्ती करण्यात येणार आहेत. पायर्‍या, टाके आदी दुरूस्तीनंतर वापरण्यात येणार आहेत.

गडावरील पायर्‍या निसरड्या

मागील काही दिवसांपासून गडावर जाण्यासाठी असलेल्या पायर्‍या निसरड्या झाल्या होत्या. तसेच गडावरील तटबंदीची पडझड झाली होती. तटबंदीवर झाडे वाढली असल्याने ती झाडे काढणे गरजेचे आहे. वरील संस्थांच्या मदतीने या गडावर संवर्धनासाठी पुरातत्व विभागाच्या परवानगीने कामे केली जात आहेत. त्यातूनच पायर्‍यांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवप्रेमी, गडप्रेमींनी या कामाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.