पेण । रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात दुष्काळग्रस्तगाव म्हणून समजल्या जाणार्या दादर गावातील गरीब कुटुंबात राहणार्या व गणपती कारखान्यात काम करणार्या अलंकार संतोष पेरवी या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत 93.80 टक्के गुण मिळवून जोहे केंद्रासह शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. अलंकार हा दादर गावातील गरीब पेरवी कुटुंबात जन्माला आलेला मुलगा.
अरबी समुद्राच्या किनारी वसलेलं पेण तालुक्यांतील दादर हे गाव एककाळी भाताचे कोठार म्हणून ओळखले जात असे. परंतु, 1989 च्या महापुरात गावाच्या सभोवताली असणारी बंदिस्ती वाहून गेल्याने सुमारे 12 हजार हेक्टर जमिनींत खारे पाणी शिरून शेती नापीक झाली तसेच गावातील बरीच घरे वाहून गेली, मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आज या घटनेला 29 वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु शासनाने कोणत्याही प्रकारे मदतीचा हात दिलेला नाही. सध्या लहान-लहान होड्यांमधून वाळू काढणे, मच्छी काढणे व त्यावर आपली उपजीविका येथील ग्रामस्थांना करावी लागत आहे, तर काही कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, आजपर्यंत एका ही शेतकर्यांनी दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे दिसत नाही. कारण कोकणातील शेतकरी खंबीर आहे. मात्र, याच दादर गावातील अलंकार संतोष पेरवी याने दुष्काळावर मात करत गणपतीच्या कारखान्यात काम करून आपल्यातील जिद्द व चिकाटीच्या जोरावर कारखान्यातून मिळणार्या उर्वरित वेळेत दहावीच्या परीक्षेत रात्रंदिवस अभ्यास करत 93.80 टक्के गुण मिळवत न्यू इंग्लिश स्कूल जोहेसह संपूर्ण जोहे केंद्रात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. भाग्यश्री सूर्यकांत म्हात्रे हिने 89.60 टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला असून, तन्मेय तुळशीदास पाटील यास 85.40 टक्के गुण मिळत तो तिसर्या क्रमांकावर राहिला आहे तसेच न्यू इंग्लिश स्कूल जोहेचा निकाल 88.78 टक्के लागला असून सेमी इंग्रजी, टेक्निकल व कन्या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे..अलंकार पेरवीच्या यशाबद्दल मुख्याध्यापक आर.डी. गावित, डॉ. शेखर धुमाळ, डॉ. अनंत पाटील, रामदास पाटील, लहू पाटील, शंकर मोकल यांच्यासह त्याचे वर्गशिक्षक व राजकीय, सामाजिक सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अलंकार पेरवी हा गरीब कुटुंबातील असल्याने व त्यास डिप्लोमा करण्याची इच्छा असल्याने पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन जोहेचा राजा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.