पालघर (संतोष पाटील) | नारळ उत्पादनात कमालीची घट झाल्याने बाजारात दर वाढल्याने त्याचा फायदा व्यापारीवर्गाला झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवा दरम्यान नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. नारळ उत्पादक कर्जाच्या ओझ्यखाली दबला गेला असून उत्सवकाळातही शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
पावसाचा अनियमितपणा, उन्हाळ्यात वीज भारनियमनामुळे अपुरा पाणी पुरवठा यामुळे नारळाची प्रतिझाड़ उत्पादन क्षमता कमालीची घटली आहे. एका दशकापासून एरियोफाइल्ड माईट(अष्टपाद कोळी) या रोगाचा फळाला झालेला प्रादुर्भाव रोखण्यात आलेले अपयश यामुळे फळांची वाढ मोठ्या प्रमाणात खूंटली आहे. तसेच फळावरिल आवरण ही डागाळते त्यामुळे फळांची वर्गवारी करताना फळांना व्यापर्यांकडून प्रतिनग पाच रूपयांचा दर दिला जातो. मजूर तसेच खतांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढून बागायतदारांना तोटा होतो. मात्र गणेशोत्सवात बाजारातील नारळाच्या किमतीत सरासरी 7 ते 10 रूपयाची वाढ होऊन त्या 20 ते 30 रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. धार्मिक कार्यात नारळाला अनन्यसाधारण महत्व असल्याने मोठी मागणी आहे. त्यामुळे आर्थिक झळ सहन करून नागरिक खरेदी करीत आहेत.
दरम्यान शासनाने नारळाला हमी भाव देणे आवश्यक आहे. शिवाय नारळ खरेदी-विक्री केंद्र सुरू केल्यास किमती आवाक्यात राहून नागरिकांची पिळवणूक थांबेल. नारळ बोर्डाकडून शेतकर्यांचे गट तयार करून जिल्हास्तरावर नारळ उत्पादन संघाची निर्मिती केली. त्यानंतर सोसायटीच्या माध्यमातून दोन वर्षकरिता लागणारी खते, कीटकनाशक नारळ उत्पादकांना वाटप केल्याने फायदा झाला होता. मात्र ही योजना औटघटकेची ठरल्याने उत्पादक पुन्हा संकटात सापडला आहे. दरम्यान शासनाने याची दखल न घेतल्यास कल्पवृक्षाचे अस्तित्वच धोक्यात येईल.अस जाणकारांचे मत आहे.