जळगाव- गणपती नगरातील इस्टेट ब्रोकर मनोज नाथुराम चौधरी यांनी घरापासून 200 मीटर अंतरावर उभी केलेली कार अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना 16 रोजी समोर आली आहे. या परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेर्यात हा प्रकार कैद झाला असून 3.45 वाजेच्या सुमारास कार घेवून जात असल्याचे दिसून येत आहे.
गणपती नगरात मनोज चौधरी हे पत्नी, दोन मुली व एक मुलगा या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय करुन ते उदरनिर्वाह भागवितात. त्याच्याकडे स्वतःच्या मालकीची मारुती कंपनीची इर्टीगा गाडी (क्र. एम.एच. 19 बी.यू. 2020) आहे. नेहमीप्रमाणे चौधरी यांनी 15 रोजी सायंकाळी 7.30 वाजता त्यांची कार घरापासून शालीमार अपार्टमेंटजवळ उभी केली होती. कारचा सेंटर लॉक केलेले होते. 16 रोजी सकाळी 9 वाजता कामकाजासाठी जाण्यास निघाले असता, त्यांना कार दिसून आली नाही. चौधरी यांनी जे.के.महाजन व शेजारच्यांसह परिसरात गाडीचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. चोरीची खात्री झाल्यावर चौधरी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. चौधरी यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरोधात 5 लाख रुपये कार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार जातांना दिसतेय
या परिसरात रस्त्यालगत एका घराच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास कुणीतर कार घेवून जातांना दिसत आहे. कॅमेर्यांमध्ये चोरटे पूर्णपणे स्पष्ट दिसून येत नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.