मेहरुण चौपाटीवर वाजत गाजत बाप्पाला निरोप, मिरवणुकीने वेधले लक्ष,मोठ्या मूर्तींचे क्रेनच्या सहाय्याने विसर्जन
जळगाव- एक दोन तीन चार, गणणपतीचा जयजयकार…,गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या…,अशा गगनभेदी घोषणा देत वाजत गाजत विघ्नहर्त्या गणरायाला अनंत चतुदर्शीच्या दिवशी मेहरुण तलावावर निरोप दिला आहे. सकाळी मानाच्या गणपतीची महाआरती झाल्यानंतर शिस्तबध्द मिरवणुकांना सुरुवात झाली. तब्बल 19 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकांनी अवघे जळगाव शहर दणाणले होते. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच वाहतुकीला अडथळा ठरु नये म्हणून बॅरीकेट लावण्यात आले होते.
लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर मनोभावे पूजन करुन दहाव्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पाच्या निरोपासाठी मनपा प्रशासनाने मेहरुण तलावावर तयारी केली होती. गणेश घाटावर घरगुती मूर्तींसह पाच फुट उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर पाच फुटापेक्षा अधिक उंच असलेल्या मूर्तींचे विसर्जन सेंट टेरेसा स्कूलच्या मागील भागात क्रेनच्या सहाय्याने विसर्जन करण्यात आले. याठिकाणी स्वंयसेवकांनी तराफ्यावर मूर्ती घेवून जावून विसर्जन केले.
महाआरतीने मिरवणुकीस सुरुवात
मानाच्या मनपा गणरायाची महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, आयुक्त डॉ.उदस टेकाळे, पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाआरती केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. रात्री 8 वाजता टॉवर चौकात मिरवणूक आल्यानंतर महाआरती झाली. यावेळी गणेश भक्तांची गर्दी होती.
मिरवणुकीने परिसर दणाणला
सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे शिस्तबध्द मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील गणेश मंडळ सहभागी झाले होते. लेझीम पथक, सजीव आरासने मिरवणुकीने लक्ष वेधले. तसेच ढोल-ताशांच्या गजरात परिसर दणाणला होता. यावेळी गणेश भक्तांचा जनसागर उसळला होता.
गणेश मंडळांचे ठिकठिकाणी स्वागत
गणेश विसर्जनाची मिरवणूक नेहरु चौक ते टॉवर चौकात आल्यानंतर सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि मनपातर्फे स्वागत करण्यात आले. मिरवणूकीतील गणेश मंडळांचे पदाधिकार्यांचा मनपा, केशव स्मृती प्रतिष्ठान,शिवसेना, भाजप, एल.के.फांउडेशन, साईमत, जिल्हा फोटोग्राफर असोशिएशन यांच्यासह संघटनातर्फे स्मृतीचिन्ह, गुलाबपुष्प देवून स्वागत केले.
मनपासह धर्माधिकारी प्रतिष्ठानने केले निर्माल्य संकलन
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलनासाठीस्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. गणेश घाटावर तसेच मोठे गणपती मुर्ती विर्सजन चौपाटी ठिकाणी 4 कंटनेर, 4 घंटागाड्या, 4 ट्रॅक्टर, 2 स्किल लोडर निर्माल्य संकलनासाठी ठेवण्यात आले होते. मनपातर्फे 70 टन निर्माल्य संकलन करण्यात आले आहे. संकलित केलेल्या निर्माल्यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दिली. तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, सागरपार्क आणि मेहरुण चौपाटीवर श्री सेवकांनी निर्माल्य संकलित केले.
सामाजिक एकात्मतेचे दर्शन
भिलपूरा चौकाच गणेश विसर्जन मिरवणूक पोहचल्यानंतर येथील दर्ग्यावर चादर चढविण्यात आली. त्यामुळे सामाजिक एकात्मतेचे दर्शन झाले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, आयुक्त डॉ.उदस टेकाळे, पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, अयाज अली यांच्यासह सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिसांनी अडविल्याने मंडळाचा महामार्गावर ठिय्या
पिंप्राळा येथील प्रयास मंडहाचे कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीसाठी गणेशमूर्ती घेवून जात असतांना त्यांच्याकडे परवानगी नसल्याने पोलिसांनी त्यांची मिरवणुकी अडवण्यात आली होती. बुधवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडलेल्या मिरवणुकीमुळे मंडळाच्या तरुणांनी गोंधळ घातल महामार्गावरच ठिय्या मांडला होता. अधिकृत परवानगी नसल्याने त्यांना विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत प्रवेश नव्हता. कार्यकर्ते गोंधळ घातल असल्याने रामानंदनगर पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर त्यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. तसेच परवानगी घ्या, यानंतर जो क्रमांक मिळेल त्यानुसार मिरवणुकीत सहभागी होता येईल असे सांगितले. मात्र कार्यकर्ते एैकण्यास तयार नव्हते. यामुळे कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरमधील गणपती महामार्गावर ठेवला व ठिय्या आंदोलन केले. पोलीस निरिक्षकांनी पोलीस अधीक्षकांना प्रकार कळविला. त्यांच्या सुचनेनुसार सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास वादावर पदडा पडला. त्यांना शिवकॉलनी थांब्यापासून थेट मेहरुण तलावावर विसर्जनासाठी सोडण्यात आले.
पहिले व शेवटचे मंडळांचे विसर्जन
शहरासह तालुक्यातील सार्वजनिक मंडळांपैकी गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सर्वप्रथम खेडी येथील मोरया मित्र मंडळाने बाप्पाचे विसर्जन केले. शुक्रवारी पहाटेपर्यंत चालेल्या विसर्जनात सगळ्यात शेवटी शहरातील रथ चौकातील श्रीराम तरुण मित्र मंडळाने पहाटे पाच वाजेच्या सुमारास श्रीचे विसर्जन केले. भरपावसातही मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा तसेच ढोल ताशांचा गजर, जल्लोषाने परिसर दणाणला हाता.
भरपावसातही गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी
जसजशी सायंकाळ होती तसेच त्याप्रमाणे घरगुती विसर्जनासह सार्वजनिक मंडळांची मेहरुण तलावावर गर्दी होत होती. याबरोबरच तलावावर विसर्जन पाहण्यासाठी गणेशभक्तांसह नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गणेश घाटावर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. तलावात मूर्ती विसर्जन करण्यास महापालिकेच्या नियुक्त कर्मचार्यांव्यतिरक्त कुठल्याही मंडळाच्या कार्यकर्त्याला विसर्जनासाठी तलावात उतरण्याची परवानी नव्हती. त्यावर पोलीस लक्ष ठेवून होते. सेंट टेरेसा बाजूनेही मोठे गणपती पाहण्यासाठी नागरिकांनी कुटुंबासह गर्दी केली होती. भरपावसातही नागरिकांचा उत्सव कायम होता. बाप्पाला निरोप देण्यासह आलेल्या भक्तासह नागरिकांनी विसर्जन होत असलेल्या बाप्पासोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. परवानगी नसतानाही तलावात विसर्जनासाठी उतरणार्या दोन ते तीन जणांना पोलिसांनी पकडले होते. पोलीस ठाण्यात नोंद घेत, समज देवनू त्यांना सोडून देण्यात आले.
असा होता बंदोबस्त
शहरासह जिल्ह्यात या गणेशोत्सव विसजर्नात अनुचित प्रकार घडू नये तसेच विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी जिल्हाभरात बुधवारी सायंकाळी 6 वाजेपासून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यात पोलीस अधीक्षक : 1, अपर पोलीस अधीक्षक : 2, उपअधीक्षक : 10 , पोलीस निरीक्षक : 32, उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक : 90, कर्मचारी : 3200, आरसीपी प्लाटून : 8 (एका प्लाटूनमध्ये 29 कर्मचारी) ,एसआरपी कंपनी : 1 (120 कर्मचारी) होमगार्ड : 1800 , बाहेरील उपनिरीक्षक : 25, क्युआरटी पथक 1, रॅपीड अॅक्शन फोर्स : 120 कर्मचारी, स्ट्रायकिंग फोर्स 16 असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार न घडता विसर्जन शांततेत पार पडले.