भुसावळ। चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधीपती असलेल्या लाडक्या गणरायाचे आसमंतांच्या हजेरीत ढोल-ताशांचा गजर करीत भाविकांनी शुक्रवारी अपूर्व उत्साहात स्वागत केले. शहरात तब्बल दोनशेवर सार्वजनिक व खाजगी मंडळांनी गणरायाची मोठ्या भक्तीभावाने स्थापना केली. रात्री उशिरापर्यंत स्थापनेचा जल्लोष शहरात सुरूच होता. यंदा तब्बल सात वर्षांनी जुळून आलेल्या दशमीच्या वृद्धीमुळे उत्सव 12 दिवस असल्याने भाविकांचा उत्साह आणखीनच दुणावला आहे. शहरात जागो-जागी ढोल-ताशांच्या गजरात व लेझीम खेळत व नाचत गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाची मूर्ती मंडळापर्यंत आणली. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. भुसावळ शहरात तब्बल 200 खाजगी व सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवाची स्थापना केली आहे. गुरुवार प्रमाणेच शुक्रवारीदेखील शहराच्या बाजाराला यात्रेचे स्वरूप आले होते. पूजा साहित्यासह सजावटीच्या साहित्याला भाविकांकडून मोठी मागणी राहिली.
रेल्वे रनिंग स्टाफतर्फे गणरायाची स्थापना
रेल्वे रनिंग स्टाफतर्फे फलाट क्रमांक तीन तसेच सीवायएम ऑफिस यार्डमध्ये गणरायाच्या मूर्तीची स्थापना सीडीईई (टीआरओ) यांच्या हस्ते करण्यात आली. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी पी.एस.पद्म, ए.टी.खंबायत, आर.वाय.भोळे, एम.पी.चौधरी, एन.डी.सरोदे, के.पी.चौधरी, आर.एम.चौधरी, जी.एस.पाटील, एम.एस.इंगळे, ए.के. कुळकर्णी, आर.एस.पाटील, डी.आर.सयाम, जी.आर.वराडे, पी.आर.पाटील, वाय.ए.कोल्हे, एन.के.धांडे, एस.एस.चौधरी, प्रकाश करसाळे, एम.पी.कुळकर्णी, आर.एल.पाटील, एम.आय.राणे, पी.पी.भंगाळे, व्ही.ए.बडगे, एच.केफ. चौरसिया, व्ही.बी.हरणे, डी.बी.महाजन, एस.एस.पाटील, किरण धांडे, सुरज सागर, आर.के.प्रजापती, व्ही.एम.पाटील, पी.जी.तांबोडी, एन.बी.बारी, एम.के.महाजन, जे.एस.सोनवणे, जी.पी.पल्हाडे, एस.एफ.काथार, एस.के.पांडे, विजय महाजन आदींनी परिश्रम घेतले.
350 पोलिसांचा बंदोबस्त
गणेशोत्सवासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात तब्बल 250 पोलिसांसह शंभर होमगार्डचा बंदोबस्त असणार आहे. या शिवाय गणेशोत्सवात पोलिसांच्या विशेष छेडखानी विरोधी पथकाची गस्त राहणार असून प्रभारी अधिकारीदेखील सायंकाळी गस्त घालणार आहेत. उत्सवामुळे पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वाजविण्याची मुभा देण्यात आली आहे.
57 उपद्रवींना शहरबंदी
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपद्रवींवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने शहर पोलीस ठाणे हद्दीतील 14 तर बाजारपेठ हद्दीतील 33 जणांना 5 सप्टेंबरपर्यंत शहरात बंदी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.