गणपती विसर्जनासाठी मुंबापुरी सज्ज

0

मुंबई । मागील बारा दिवसांपासून भक्तीभावाने पूजा करणार्‍या भाविकांकडून मंगळवारी अनंत चतुर्थी दिवशी गणपती बाप्पा मोरय्या पुढच्या वर्षी लवकर या…च्या गजरात भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. मुंबईत शंभर ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. 69 नैसर्गिक स्थळांवर तर 31 कृत्रीम तलाव, सुमारे नऊ हजार अधिकारी व कर्मचारी तैनात, सार्वजनिक मंडळे, मुंबई महापालिका आदी सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मुंबईत सुमारे 2 लाख घरगुती गणपती तर 11 हजार 500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने विसर्जनासाठी आराखडा तयार केला आहे. समुद्र चौपाटी, खाडी, नैसर्गिक तलाव आणि कृत्रीम तलाव अशा शंभर ठिकाणी विसर्जनाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. राज्य सरकार, पोलिस, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, सामाजिक संस्था, खाजगी रुग्णालये आदींची विसर्जनासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. विसर्जन स्थळावर जीवरक्षक, रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्र, ध्वनिक्षेपक, मोटरबोट, स्वागत कक्ष, चौकशी व नियंत्रण कक्ष, स्टील प्लेट, तात्पुरते शौचालये, निर्माल्य कलश, निरीक्षण मनोरे, फ्लड लाईट, सर्च लाईट, डंपर, जर्मन तराफे, विद्युत व्यवस्था, मनुष्यबळ, हॅम रेडिओ, अग्निशमन दल, आपत्कालिन व्यवस्थेत दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची माहिती परिमंडळ- 2 चे उपायुक्त आनंद वागराळकर यांनी दिली.

ध्वनीप्रदूषणाबाबत सतर्कता बाळगा
स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी जेणेकरुन साथीचे आजार किंवा लेप्टोस्पायरोसीसचा फैलाव होणार नाही. श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी येणार्‍या भाविकांमुळे वाहतूकीस अडथळा आणि ध्वनीप्रदुषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. विर्सजनाच्या मिरवणुकीत ध्वनीक्षेपकांचा आवाज संयमित ठेऊन ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, घरगुती तसेच सार्वजनिक उत्सवस्थळी जमा होणारे निर्माल्य कलशातच संकलित करून उत्सवाचे पावित्र्य जपावे, प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये असे आवाहनही पालिकेने केले आहे.

विसर्जन स्थळी या सुविधा असणार
स्टील प्लेट- 840, नियंत्रण कक्ष- 58, जीवरक्षक – 670, मोटरबोट- 81, प्रथमोपचार केंद्रे 74, रुग्णवाहिकांची संख्या- 60, स्वागतकक्ष 87, तात्पुरती शौचालये 118, निर्माल्य कलश 201, निर्माल्यवाहन, डंपर 192, फ्लड लाईट 1991, सर्चलाईट 1301, विद्युत व्यवस्था, संरक्षण कठडे, निरीक्षण मनोरे 48, जर्मन तराफा 50, मनुष्यबळ (कामगार) 5173, मनुष्यबळ (अधिकारी) 2382 आदी.

बस गाड्यांमध्ये कपात
मंगळवारी गणपती विसर्जन असल्याने मुंबई शहर व उपनगरांतील अनेक रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेस्ट बस मार्गाचे परावर्तन करण्यात येते. या दिवशी बस गाड्यांमधून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्याही कमी असल्याने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उपक्रमाच्या बसगाड्यामध्ये कपात केली जाणार आहे. या दिवशी दुपारी 2.30 वाजल्यानंतर एकूण 3404 बसगाड्यांपैकी 1687 बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यात येणार आहेत, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. 69 नैसर्गिक स्थळांवर तर 31 कृत्रीम तलाव बांधून गणेश विसर्जनासाठी सोय केल्यामुळे उद्या गणेशभक्तांची मोठी सोय होणार आहे. जलप्रदूषणाच्या मुद्याला गांभीर्याने घेऊन यंदाही महापालिकेने कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली असून त्यासाठी महापालिकेने गणेशभक्तांना आवाहन केले आहे. दीड, पाच, सात दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांना या कृत्रित तलावांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.

वाहतुकीची व्यवस्था हाताळायला 3600 वाहतूक पोलीस, त्यांच्या जोडीला 500 ट्रॅफिक वॉर्डन असतील. यंदा मुंबईतील महत्त्वाची मंडळे आणि संवेदनशील ठिकाणी विशेष सुरक्षा देण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत. लालबागच्या राजाला दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असून प्रमुख चौपाट्यांवर विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत. 5 हजार सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच प्रमुख चौपाट्यांवर विशेष सीसीटीव्ही व्हॅनही तैनात करण्यात येणार आहेत.

विसर्जन करताना घ्यावयाची काळजी
खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नका.
भरती व ओहोटीच्या वेळांची माहिती समुद्रकिनाऱयांवर लावण्यात आली आहे ती समजून घ्या.
गणेशमूर्ती विसर्जनाकरीता शक्यतो महापालिकेमार्फत नेमण्यात आलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्या.
अंधार असणाऱया ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाण्याचा प्रयत्न करु नका.
मोठय गणेशमूर्तींबरोबर प्रत्यक्ष विसर्जनाकरीता समुद्रात जाणाऱया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिरगणती करुन जावे.
महापालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करु नका.
गणेशमूर्तींचे विसर्जन करताना शक्यतो तराफ्यांचा, प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करा.
समुद्रात / तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित त्याची
माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना / पोलिसांना / जीवरक्षकांना द्या.
नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवत असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.
मुलांची काळजी घ्या.

खबरदारीच्या सूचना
भाविकांनी आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात / विसर्जनस्थळी जाण्यापासून मज्जाव करावा.
गणेशभक्तांनी मूर्तींचे विसर्जन करतेवेळी पाण्यात गमबुट घालावेत.
महापालिकेने केलेल्या विसर्जनाच्या व्यवस्थेचा म्हणजे विनामुल्य तराफ्यांचा किंवा बोटींचा वापर करावा.
मद्यप्राशन करुन समुद्रकिनाऱयावर विसर्जनस्थळी जाऊ नये कारण अशा व्यक्तिवर मस्त्सदंशावरील वैद्यकीय उपचारांची परिणामकता घटते.
समुद्रातून बाहेर आल्यावर आपणांस मत्स्यदंश झाल्याचे जाणवल्यास तात्काळ सदर जागा स्वच्छ पाण्याने धुवावी अथवा उपलब्ध असल्यास त्यावर बर्फ लावणे.
माशांचा दंश झालेल्या ठिकाणाहून रक्तस्राव होत असेल तर जखमेचे ठिकाण स्वच्छ कपड्याने किंवा हाताने दाबून धरावे, जेणेकरुन जास्त प्रमाणात रक्तस्राव होणार नाही.
प्रथमोपचार केंद्रात जाऊन वैद्यकीय सेवा घ्यावी.

गणपती विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सगळ्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, बंदोबस्तासाठी सर्वच म्हणजे सुमारे 43 हजारांचा फोर्स तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय महत्त्वाच्या चौपाट्यांवर क्यूआरटीचे पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच चौपाट्यांवर ड्रोन व दुर्बिणधारी पोलिस लक्ष ठेऊन राहणार आहेत.