पिंपरी : शहरातील पवना नदीने प्रदूषण रोखण्यासाठी तसेच गणपती विसर्जनासाठी रहाटणीतील पवना नदी घाटावर कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. गणपती विसर्जनासाठी रहाटणीकरांनी या कृत्रिम तलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आमदार लक्ष्मण जगताप युवा मंच, वस्ताद ग्रुप आणि स्वीकृत सदस्य संदीप नखाते यांच्या संयुक्त विद्यमाने हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला आहे. नद्या या आपल्या जीवनदात्या म्हणून ओळखल्या जातात. पिण्याच्या पाण्याच्या सगळ्यात मोठा स्रोत या नद्या व त्यावरील धरणे होत. मात्र याच नद्यांमध्ये प्लास्टरच्या मूर्तीसोबतच हजारो टन निर्माल्य विसर्जित करत मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. श्री गणेशाची मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिसला प्राधान्य दिले जाते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नदीच्या पाण्यात विसर्जन केल्याने पाणी दूषित होऊन पाण्यातील जीवांना त्यापासून धोका निर्माण होतो. यामुळे पर्यावरणाचा र्हास होत असल्याचा मुद्दा पुढे आल्याने आमदार लक्ष्मण जगताप युवा मंच आणि वस्ताद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पवना नदी घाटावर कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय घेतला. तसेच सर्व नागरिकांना आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन कृत्रिम तलावाच्या स्वच्छ पाण्यातच करावे असे आवाहन केले. आमच्या आवाहनास रहाटणीकरांनी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला असून त्यामुळे यापुढेही दरवर्षी अशाप्रकारे पर्यावरण संवर्धनासाठी नवनवीन संकल्पना राबविण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचेही नखाते यांनी यावेळी सांगितले.