‘गणपती स्पेशल’ एसटीला चाकरमान्यांची पसंती

0

मुंबई । गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटीने 2216 जादा गाड्या सोडलेल्या आहेत. ग्रुप बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत असून मुंबई विभागातून सोडण्यात येणार्‍या 800 ग्रुप बुकिंग बसपैकी जवळपास 700 बसेस आरक्षित झाल्याची माहिती मिळाली. महामंडळाने गेल्या वर्षीपेक्षा यंदा कोकणात जाणार्‍यांसाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांची सोय केलेली आहे. कोेकणात जाण्यासाठी ग्रुप बुकिंगला मोठ्या प्रमाणात दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे यंदाही ग्रुप बुकिंग गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. हा प्रतिसाद येत्या दिवसांमध्ये आणखी वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. शनिवारपासून संगणकीय आरक्षणासाठीही जादा बस उपलब्ध करण्यात आल्यात.

मुंबई विभागातून 1100 जादा गाड्या
मुंबई विभागातून 1100 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये तब्बल 800 गाड्या ग्रुप बुकिंगच्या आणि उरलेल्या गाड्या या संगणकीय आरक्षणावरील आहेत. 800 ग्रुप बुकिंग गाड्यांमधील 700 गाड्या आरक्षित झालेल्या आहेत. गणेशोत्सवाला अजून महिना शिल्लक असल्यामुळे प्रतिसाद वाढत गेला तर बसची संख्याच वाढवण्यावर एसटीकडून विचार केला जात आहे.