गणपुर्तीअभावी दुसर्‍यांदा स्थायी समिती तहकूब

0

जळगाव । जिल्हा परिषदेची सदस्य तसेच पदाधिकारी नेमणुक होवून महिन्याभराचा कालावधी उलटला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीनंतर जिल्हा परिषदेतील दहा विषय समिती सदस्य नेमणुक केली जाते. सदस्य नेमणुकीसाठी सर्वसाधारण सभा घेण्यात आली मात्र या सभेत निवड न होता निवडीचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना देण्यात आले आहे.

मागील स्थायी समिती कायम
सर्वसाधारण सभा होवून 15 दिवस उलटले तरीही सदस्यांची नेमणुक झालेली नाही. दरम्यान शनिवारी 29 रोजी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली होती मात्र सदस्य संख्या (गणपुर्ती) पुर्ण नसल्याने ती तहकुब करण्यात आली. स्थायी समिती बैठक तहकुब होण्याची ही दुसरी वेळ आहे. या अगोदर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर 30 दिवसाच्या आत स्थायी समिती बैठक घेणे बंधनकारक असल्याने पहिली स्थायी सभा घेण्यात आली मात्र ती देखील सदस्य संख्या पुर्ण नसल्याने तहकुब करण्यात आली होती. पहिल्यांदा तहकुब करण्यात आलेली स्थायी समिती बैठक यावेळी कायम करण्यात आली. मात्र अजेंड्यावर कोणतेही महत्त्वाचे विषय नव्हते. विषय समिती सदस्य निवडीचे ग्रहण सुटत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.