गणरायाची स्वागताची तयारी पूर्ण

0

तळेगाव दाभाडे : लाडक्या गणरायाचे आज (शुक्रवारी) सर्वत्र आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी तळेगाव दाभाडे परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्तेे सज्ज झाले आहेत. गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असून, सर्वत्र चैतन्यदायी वातावरण आहे.

तळेगाव या ऐतिहासिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुमारे 115 वर्षांपूर्वी सुरू केलेला आहे. शहर आणि परिसरात सुमारे शंभर सार्वजनिक मंडळे आहेत. या मंडळापैकी काही मंडळे ही शंभर वर्षांपूर्वीची आणि लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली आहेत. अनेक गणेश मंडळांनी यंदा आकर्षक देखावे व सजावट केलेली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी ढोल-ताशा, लेझीम व बँड पथकेदेखील सज्ज झाली आहेत. काही मंडळांकडून हलते देखावे, जिवंत देखाव्यांचा सराव चालू असून, त्यावर अखेरचा हात फिरविला जात आहे. चौकाचौकात हार, फुले, दुर्वा, केवडा, उदबत्ती, कापूर विक्रीची दुकाने लागलेली आहेत. तळेगाव आणि परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.