गणवेशचे पैसे थेट खात्यात जमा होणार

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतर्फे गणवेशाचे वाटप केले जाते. मात्र यावर्षापासून गणवेशाचे वाटप न करता गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थी व आई या दोघांचे संयुक्त बँक खाते सुरु करावे लागणार असून या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली. दरम्यान बुधवारी 31 रोजी कुसुंबा येथे शिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी व लिपीकांची बैठक घेतली. या बैठकीत कर्मचार्‍यांचे पगार कसे करावे, वैद्यकीय बिल कसे काढावे, शाळा सुरु होण्याअगोदर करावयाची कारवाई याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड, पी.सी.पाटील, जमादार ठाकुर यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

बदली प्रक्रियेस 30 जून पर्यत वाढ
जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या बदलीसाठी मे महिन्यात बदली प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र बदली प्रक्रियेसाठी शासनाने फेबु्रवारी 2017 मध्ये नवीन परिपत्रक जारी करुन बदली प्रक्रियेच्या नियमावलीत बदल केली. नवीन नियमावलीस शिक्षक संघटनेने विरोध दर्शविला आहे. हा विषय उच्च न्यायालयात गेल्याने 16 जून पर्यत बदलीस स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान शिक्षण विभागाला 30 जून पर्यत बदली प्रक्रियेस वाढ मिळाली असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.