गणवेश अनुदानासाठी खाते उघडण्यास पालकांची अनास्था

0

भुसावळ । पालिकेसह तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मिळून 89 शाळांमधील 6 हजार 34 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासाठी प्रत्येकी 400 रूपये मिळणार आहेत. यासाठी 24 लाख 13 हजार 600 रुपये निधी शालेय शिक्षण विभागाला प्राप्त झाला असून हे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग होतील. मात्र पालक खाते उघडत नसल्याने आतापर्यत 25 टक्के विद्यार्थ्यांनी बँक खाते उघडल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दोन गणवेशासाठी 400 रुपये निधी
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय गणवेश शिवून मिळायचे. मात्र, कापडाचा दर्जा, गणवेश मिळण्यास विलंब, मापे व्यवस्थित नसणे यावरुन शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोष सहन करावा लागायचा. अनेकवेळा आर्थिक गुंता वाढायचा. यावर उपाय म्हणून यंदापासून विद्यार्थ्यांना गणवेश शिवून देण्याऐवजी दोन गणवेशासाठी 400 रुपये निधी बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय झाला.

विद्यार्थी व आईच्या नावे संयुक्त खाते
यासाठी विद्यार्थी आणि त्याच्या आईच्या नावे संयुक्त बँक खाते काढणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे दोन गणवेश घेतल्याचे बिल आपापल्या शाळेत सादर केल्यावर विद्यार्थ्यांचा संयुक्त खात्यावर प्रत्येकी 400 रुपये वर्ग केले जातील. भुसावळ तालुक्यात 89 शाळांमधील 6 हजार 34 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, शाळा उघडून 14 दिवस झाले तरीही अद्याप केवळ 25 टक्के विद्यार्थ्यांनी संयुक्त खाते उघडले आहे. दुसरीकडे 400 रुपयात दोन गणवेश मिळतील कसे? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

प्रक्रिया सुरु
तालुक्यातील 6 हजार 34 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 400 रुपये देण्यासाठी एकूण 24 लाख 13 हजार 600 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांनी गणवेश खरेदीचे बिल सादर करताच त्यांच्या खात्यात 400 रुपये वर्ग केले जातात. भुसावळ तालुक्यात सध्या ही प्रक्रिया राबवणे सुरू आहे.