शिक्रापूर । शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक बचत व्हावी म्हणून राबवलेल्या उपक्रमामुळे शिक्रापूर गावठाण येथील शाळेत सर्व पालकांची गणवेश खरेदीत जवळपास साडेपाच लाख रुपयांची बचत झाली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विक्रमशेठ भुजबळ यांनी याकामी पुढाकार घेतला. शिक्रापूर येथील कापड व्यावसायिक राकेश मेटे यांच्या सहकार्याने या उपक्रमाअंतर्गत शाळेतील ११८५ विद्यार्थ्यांच्या पालकांची प्रत्येकी साधारण पाचशे रुपयांची बचत झाली. केवळ पाचशे रुपयांत विद्यार्थ्यांना शाळेचे दोन गणवेश, मोजे, बूट, टाय आणि बेल्ट असा संपूर्ण सेट मिळाला. प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थांना हे सेट नुकतेच वाटप करण्यात आले. या सर्व शालेय साहित्याची एकूण किंमत जवळपास १००० रुपयांपर्यंत असून केवळ पालकांच्या हिताचा विचार करून हा उपक्रम राबवल्याचे अध्यक्ष विक्रम भुजबळ यांनी सांगितले.
गणवेश वाटपप्रसंगी मुख्याध्यापक रोहिणी खंडागळे, सुरेश जाधव, अनिल व्यवहारे, अर्चना मांढरे, वर्षा जकाते सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच ज्यांची आर्थिक कुवतच नसलेल्या अल्प उत्पन्न गटातील २५ विद्यार्थ्यांना राकेश मेटे यांनी स्वखर्चाने मोफत गणवेश दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.