गणित आणि भूमिती विषयावर व्याख्यान उत्साहात

0

* पुण्यातील तज्ञ रवीकुमार वरे यांनी केले मार्गदर्शन
* शानभाग विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन
* ‘गुणवत्ता विकास वाढ’ विषयांवर चर्चा
जळगाव – शानभाग विद्यालय येथे घेण्यात आलेल्या ‘गुणवत्ता विकास वाढ’या विभागा अंतर्गत इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गणित आणि भूमिती या विषयाची भिती कशी घालवाल’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील गणित विषयाचे तज्ञ रवीकुमार वरे हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे व विभाग प्रमुख जगदीश चौधरी यांची उपस्थिती होती.

विविध उदाहरणांसह दिले स्पष्टिकरण
परीक्षेला सामोरे जातांना विद्यार्थ्यांनी गणित आणि भूमिती या विषयाची भिती कशी घालवावी याबाबत आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये परीक्षेस सामोरे जातांना गणित – भूमितीची तयारी कशी करावी, सर्वात आधी आपल्याला सोपी जाणारी प्रश्नांची उत्तरे सोडवावी आणि नंतर काठीण्य पातळीची गणिते कशी सोडवावी यासंदर्भात विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले. तसेच काही विद्यार्थ्यांना व्यासपिठावर बोलवून गणिते सोडविण्यास सांगितले. यानंतर परीक्षेत प्रकरणानुसार गुणांची विभागणी कशी असते हे समजावून सांगितले तसेच अभ्यास एकाग्रतेने व अखंडपणे करणे ज्यामुळे आत्मविश्वास वाढून इच्छित ध्येय साध्य करता येइल. हा विषय सोपा कसा आहे हे उदाहरणे देऊन पटवून दिले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला. शेवटी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यातआला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसोबत अनेक पालक सुध्दा उपस्थित होते.पालकांनीसुध्दा आपल्या गणिताविषयी असलेल्या अडचणी मांडल्या. त्यांना पण सरांनी समर्पक उत्तरे देवून समाधान केले. पाहुण्यांचा परिचय, प्रास्ताविक आणि आभार श्री. श्याम बाजपेयी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शालेय परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.