गणेशभक्तांचा प्रवास सध्या तरी खड्ड्यांतूनच

0

अलिबाग – गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमान्यांची पावले आता कोकणाकडे वळू लागली आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात काही ठिकाणी सध्या तरी खड्ड्यांचे साम्राज्य कायम असल्याने गणेशभक्त खड्डे चुकवत पुढे मार्गक्रमण करीत आहेत. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 ऑगस्टपर्यंत हा रस्ता सुस्थितीत आलेला असेल असे सांगितले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्‍वासन सध्या पडलेल्या खड्ड्यांमध्येच गुंतून राहिले आले, तरी संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांनी पुढील दोन दिवसात खड्डे बुजवलेले असतील असे स्पष्ट केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून मुंबई – गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या 84 कि. मी. मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असले, तरी हा मार्ग पूर्णत्वास कधी जाईल हे ज्योतिषाने सांगणे सुद्धा मूर्खपणाचे होईल, असे हा नियमित त्रास अनुभवणार्‍या जनतेचे म्हणणे आहे. गणेशोत्सवाचे दरम्यान नेहमी पेक्षा जास्त वाहने या मार्गावरून धावत असतात व त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या ह्या दरम्यान गंभीर होत असते.

गणेशोत्सवासाठी जाणार्‍या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ
या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात नियमितता नसल्याने या मार्गात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नागोठणे विभागात पळस, निडी तसेच चिकणी, वाकण पट्ट्यात ही समस्या जादा प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवले जाऊन रस्ता सुस्थितीत होईल असे जाहीर आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात 21 ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी खड्ड्यांची परिस्थिती जैसे – थे च असल्याचे उघडपणे दिसत आहे. आज सोमवारपासून गणेशोत्सवासाठी जाणार्‍या वाहनांच्या संख्येत प्रचंड अशी वाढ व्हायला प्रारंभ झाला आहे.

ठेकेदाराची लागणार कसोटी
रस्त्याचे ठेकेदार असलेल्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून खड्डे भरावयास सध्या तरी प्रारंभ झाला असल्याने पुढील दोन दिवसात रस्त्याची निश्‍चितच सुधारणा झाली असेल असे ते स्पष्ट करतात. येथे पडणार्‍या मुसळधार पावसाने काम करण्यास विलंब होत आहे असेही ते सांगतात. 23 ऑगस्टला या मार्गावरून नागोठणे बाजूकडे येणार्‍या वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे. पडलेल्या खड्ड्यांवर केली जात असलेल्या मलमपट्टीचा तेव्हा खर्‍या अर्थाने कस लागणार असल्याने त्या निमित्ताने ठेकेदाराची सुद्धा ती कसोटीच ठरणार असल्याचे वाहनचालक तसेच प्रवासी म्हणतात.

महामार्गावर सीसीटीव्हीची नजर
महाड । कोकणात गणेशोत्सवासाठी येणार्‍या गणेश भक्तांपुढे कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. महामार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. महामार्गावर आठ महत्वाच्या ठिकाणी अठरा कॅमेरे बसवले जाणार आहेत. याशिवाय प्रवाशांसाठी सुविधा व मदत केंद्रही असणार आहेत. गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी प्रशासनाला मोठी डोकेदुखी असते. यासाठी अवजड वाहनांना या काळात बंदी करण्यात आली आहे तरीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे. महामार्गावर हमरापूर फाटा,पेण खोपोली बायपास, रामवाडी चौकी, इंदापूर स्टँड, पाली जोड रस्ता, महाड शहर, नातेखिंड व विसावा कॉर्नर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. या ठिकाणाहून वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाणार असुन कोंडी डाल्यास तातडीने त्यावर उपाय करणे शक्य होणार आहे.

भक्तांच्या सुविधेसाठी नऊ ठिकाणी मदत केंद्र उभारणार
गणेशभक्तांच्या सुविधेसाठी पोलिस उपअधिक्षक, निरिक्षक, उपनिरिक्षक, कर्मचारी कर्मचारी सज्ज ठेवलेले जाणार आहेत. होमगार्ड, राज्य राखिव दल, शिघ्र कृती दल, महामार्ग पोलिस बंदोबस्तासाठी सज्ज ठेवले आहेत. बिनतारी संदेश यंत्रणा व वाहनेही दिमतीला असणार आहेत. महामार्गावर हमरापूर फाटा, वाकण फाटा, पाली शहर, पेण हायवे पोलिस चौकी वडखळ, सुकेळी खिंड, माणगाव, लोणेरे फाटा व नातेखिंड या नऊ ठिकाणी मदत केंद्र उभारणार आहेत. प्रवाशांना आवश्यक ती मदत व रुगणवाहिका उपलब्ध होईल. परिचारिका तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रही या काळात सज्ज ठेवले जाणार आहे.