गणेशभक्तांच्या मदतीला कोकण रेल्वे, परतीच्या फेर्‍या 10 सप्टेंबरपर्यंत

0

महाड । कोकण मार्गावर सोडण्यात आलेल्या गणपती स्पेशल गाडयांमुळे गणेशभक्त गावी वेळेत पोहोचले. आता गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरू झाला असुन कोकणरे ल्वेच्या गणपती स्पेशल गाडया 10 सप्टेंबरपर्यंत धावणार असल्याने गणेशभक्तांना गणराय चांगलाच पावला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे व वाहतूककोंडीला कंटाळलेल्या चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासातही कोकण रेल्वेची वाट धरली आहे. यावर्षी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी कहरट केला तसेच पर्यायी मार्गांवरही खड्डे असल्याने गणेशभक्तांसाठी पावसाळ्यात रस्ता प्रवास अडचणीचा ठरला. रेल्वे प्रशासनाने यंदा कोकण मार्गावर नियमित रेल्वेगाडयांच्या 10 फेर्‍यांसह सर्वाधिक 250 फेर्‍या सोडल्याने चारमान्यांचा गावी जाण्याचा प्रश्न मिटला. आता परतीच्या प्रवासातही कोकण रेल्वेने चाकरमान्यांना हात दिला आहे.

रायगडातील प्रवाशांनाही प्रवासाचा लाभ
तळ कोकणापासून रायगडातील प्रवाशांनाही या प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. गणेशोत्सव काळात कोकण मार्गावर प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाल्या नंतर आता चिपळूण ते छत्रपती शिवाजी टर्मिनस ही विशेष गाडी 12 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.रत्नागिरी ते दादर या विशेष गाडीलाही प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.ही गाडी 8 सप्टेंबरपर्यंत, तसेच सावंतवाडी- पनवेल ही विशेष गाडी 10 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.