चिंबळी : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता अवघ्या महिना उरला आहे. त्यामुळे चिंबळी परिसरातील गणेशमूर्ती बनविणार्या कारागिरांची मूर्ती साकारण्याची लगबग दिसून येत आहे. काही कारागीर विलोभनीय मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत. तर काही कारागीर मूर्तींची रंगरंगोटी करत आहेत. चिंबळी परिसरातील तयार झालेल्या गणेशमूर्तींना पंचक्रोशीतून मोठी मागणी असते. कुरुळी परिसरातील कुंभारवाड्यातही गणेशमूर्ती साकारण्याचे काम जोरात सुरू आहे.
अनेकांची आगाऊ बुकींग
कुरुळी (ता. खेड ) येथील मूर्तीकार ह. भ. प. किसन महाराज माळशिकर व ज्ञानेश्वर माळशिकर म्हणाले की, आम्ही दरवर्षी एक फुटापासून ते सात फुटापर्यंत उंचीच्या गणेशमूर्ती तयार करतो. महिनाभर रंगरंगोटीचे काम सुरू असते. या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व नागरिकांकडून गणेशमूर्तींना मोठी मागणी असते. तयार झालेल्या गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी परिसरात विविध ठिकाणी आडवडाभर स्टॉल्स लावण्यात येतात. वर्षानुवर्षे आमच्याकडे ग्राहक गणेशमूर्ती घेत आहेत. अनेक जण आगाऊ बुकींग करतात, असे त्यांनी सांगितले.