जळगाव– मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना पोस्टाद्वारे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गाळे ताब्यात घेण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून गणेशविसर्जनानंतर गाळे ताब्यात घेण्याची कारवाई केली जाणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी बाहेरुन अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. गाळे ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने आधीच दिले आहे. प्रशासकीय पातळीवर गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मनपातर्फे फुले व्यापारी संकुलातील गाळेधारकांना नोटीस बजावल्या होत्या.मात्र गाळेधारकांनी त्या स्वीरल्या नाहीत. त्यामुळे आता पोस्टाने नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. गणेशविसर्जनानंतर येत्या 12 किंवा 13 तारखेला गाळे ताब्यात घेण्याची कारवाई केली जाणार आहे.
अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविला
गेल्या सात वर्षापासून प्रलंबित असलेल्या गाळ्यांवर कारवाई केली जाणार आहे. गाळे ताब्यात घेण्याच्या कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी बाहेरुन अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
आचारसंहितेची अडचण नाही
गणेशविसर्जनानंतर लगेचच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान मनपातर्फे गाळ्यांची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. गाळ्यांच्या कारवाईला आचारसंहितेची अडचण येणार नसल्याने गणेशविसर्जनानंतर कारवाई केली जाणार आहे.
Prev Post
Next Post