पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे : भुसावळात शांतता समितीची बैठक
भुसावळ- गणेशोत्सव हा आपल्या सर्वांचा असल्याने या उत्सवात कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची गणेशभक्तांनी दक्षता घ्यावी तसेच गणेशोत्सवाचा निधी विधायक कामासाठी वापरल्यास खर्या अर्थाने गणेशोत्सव साजरा केल्याचे समाधान मिळेल. मिरवणुकीत डॉल्बी व डिजेचा वापर बंद करून पारंपरीक वाद्यांवर भर द्यावा यामुळे अनेकांमध्ये उत्साह निर्माण होतो तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक दिसून येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या अभ्यासपुर्ण मनोगतातून उपस्थित सर्व गणेशभक्तांना पारंपारीक लेझीम, ढोलताशे,झांज पथकाच्या माध्यमातून श्री गणरायाचे विसर्जन केल्यास सर्वांना आनंद मिळेल, असे शांतता समितीच्या बैठकीतून गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांना आवाहन केले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
आगामी काळात गणेशोत्सव व मोहरम हे दोन साजरे होणार असल्याने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे दोन्ही सण उत्साहाने व शांतेत पार पडण्यासाठी उपाय योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी भुसावळातील अहील्यादेवी कन्या विद्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, नगरसेवक युवराज लोणारी, मुन्ना तेली, प्रमोद सावकारे, रमेश मकासरे यांच्यासह बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. बैठकीला तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच व शहरातील शांतता समितीचे सदस्य, मंडळाचे पदाधिकारी व महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
प्रतिज्ञेचे पालन करावे
गणेशोत्सव दरम्यान सर्व गणेश भक्तांनी आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचे पालन करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञेप्रमाणे सर्वांनी एकत्र राहून शहर व परीसरातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करावे.गणेशभक्तांनी परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा करावा. आपल्या या जंक्शन शहरात सर्व जातीधर्माचे नागरीक रहीवास करीत असल्याने शहराकडे भारताचे छोटे प्रतिबिंब म्हणून पाहीले जाते. याला कुठेही गालबोट लागता कामा, नये असे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड म्हणाले.
ठिकठिकाणी मुख्य चौकात सजावट करावी
शहरातील सर्व नागरीकांनी शांतता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून शहरात कुठल्याही प्रकारचे जातीय तेढ नाही तसेच श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणूकप्रसंगी काहीठ राविक चौकातच मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होते यासाठी बाजारपेठ पोलीस ठाणे, वसंत टॉकीज चौक, अशा विविध भागातील मुख्य चौकात सजावट केल्यास भाविकांची गर्दी विभागली जाईल असेे नगरपालीकेचे गटनेते हाजी मुन्ना तेली यांनी सांगितले.
सोशल मिडीयाचा दुरूपयोग करू नये
गणेशोत्सव दरम्यान सोशल मिडीयाचा वापर होता कामा नये यामुळे विनाकारण शहरातील शांततेला बाधा पोहचण्याची दाट शक्यता असते. यासाठी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी वरणगाव रोडवरील रेल्वे प्रशासनाच्या गार्ड लाईन मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केल्यास या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरळीत होईलख, असे रमेश मकासरे यांनी सांगीतले.
नगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक सुविधा
शहरातील जातीय सलोख्याला गालबोट लागणार नाही याची गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी. गणेशोत्सवासाठी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे तसेच ठिकठिकाणी हॅलोजन लावून मिरवणुकीचा मार्ग प्रकाशमय केला जाणार आहे. इतकेच नव्हेतर नगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक सुविधा पुरवल्या जातील, असे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी यांनी सांगितले.
मंडळानी अधिकृतरीत्या नोंदणी करावी
गणेशोत्सव साजरा करणार्या सार्वजनिक गणेश मंडळानी धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामपंचायतीची परवानगी घेणेही गरजेचे असून जास्त मोठ्या मुर्तीची स्थापना न करता केरळ राज्याला मदतीचा हात द्यावा तसेच श्रींचे विसर्जन वेळेच्या आतच करावे. आगामी काळात होवू घातलेल्या निवडणुकांसाठी आगळ्या-वेगळया पद्धतीने पारदर्शक मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी जनजागृतीचे बॅनर मंडळानी लावल्यास सर्वांना फायद्याचे होईल तसेच आपापल्या प्रभागातील मतदारांची खात्री सुद्धा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी करावी, असे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी उपस्थितांना आवाहन केले.
यांनीही केले मनोगत व्यक्त
शांतता समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या माध्यमातून सुरूवातीला मंडळाचे पदाधिकारी व शांतता समितीच्या सदस्यांना मनोगत व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार रीतेश शर्मा, अनिल पाटील, मनोज चौधरी, राजू खरारे यांनी मनोगत व्यक्त करून काही शंका उपस्थित केले. त्यांच्या या मनोगतातील शंकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी समर्पकपणे उत्तरे दिली. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन शहर वाहतूक शाखेचे दीपक गंधाले तर आभार बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार यांनी मानले.