सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गणेशोत्सव म्हटले की त्याची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली असे सांगितले जाते. किमानपक्षी इतिहास तरी तसेच शिकविण्यात आलेला आहे. परंतु, टिळकांच्याहीआधी थोर क्रांतिकारक भाऊ रंगारी अर्थात भाऊ लक्ष्मण जावळे यांनी 1892 साली गणेशोत्सवास सुरुवात केली होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतरत्र गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा निर्माण झाली. त्यामुळे गणेशोत्सवाचे जनकत्व टिळकांकडे कसे गेले? हा मोठाच प्रश्न आहे. भाऊसाहेब रंगारी यांच्यापासून प्रेरणा घेऊनच टिळकांनी 1894 साली विंचूरकरवाड्यात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली होती. म्हणजे, तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सवात सहभागी झालेले टिळक भाऊसाहेबांच्याऐवजी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कसे झाले? याचा उलगडा करण्याचा खटाटोप कधीही इतिहासाने केला नाही. हे भाऊ रंगारी नेमके होते तरी कोण? तर ते थोर क्रांतिकारक होते. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांच्या दडपशाही धोरणामुळे देशभरात क्रांतीची लाट पसरली. पुण्यात क्रांतीची मशाल पेटविण्यात भाऊ रंगारी यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांची क्रांती साधीसुधी नव्हती तर ती सशस्त्र होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी समाजाला एकत्र करण्याची खूणगाठ बांधली. त्यातून त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच 1892 साली भाऊ रंगारी व त्यांच्या सहकार्यांनी पुण्यातील शालूकरांच्या बोळात म्हणजेच बुधवारपेठेत पहिला सार्वजनिक गणपती बसवला. बळवंत सातव, गणपतराव घोटवडेकर, सांडोबाराव तरवडे, कृष्णाजी खाजगीवाले, बाळासाहेब नातू, लखीशेठ दंताळे, आप्पासाहेब पटवर्धन आणि दगडूशेठ हलवाई यांच्याबरोबर हा पहिला गणेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाल्याची ऐतिहासिक नोंद आहे. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1893 साली भाऊ रंगारी गणपती, गणपतराव घोटवडेकर यांचा गणपती आणि नानासाहेब खासगीवाले यांचा गणपती असा दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरु झाला. विशेष बाब म्हणजे, 26 सप्टेंबर 1893च्या दैनिक केसरीच्या अग्रलेखात स्वतः टिळकांनी गणेशोत्सवाच्या उपक्रमाची दखल घेऊन या मंडळींच्या कार्याचे कौतुक केले होते. उत्सवाचा उद्देश, ब्रिटिश सरकारविरोधात समाजाला एकत्रित आणण्याची त्यामागची भाऊ रंगारी यांची भूमिका आणि एकतेचे महत्व लक्षात घेता, टिळकांनी 1894 साली सरदार विंचूरकरवाड्यात हा उत्सव सुरु केला होता. त्यानंतर 1905 साली जुना गायकवाडवाडा व सद्याचा केसरीवाडा येथे हा उत्सव सुरु झाला. हा इतिहास जर ठसठसीत वास्तव असेल तर गणेशोत्सवाचे जनक टिळक नव्हे भाऊ रंगारीच होते, हे स्पष्ट होते. त्यामुळे यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे सव्वाशे वे वर्ष नाही तर 126 वे वर्ष आहे हेही स्पष्ट होते. त्यामुळे पुणे महापालिका आणि राज्य सरकार सव्वाशे वे वर्ष साजरे करण्याचा जो डिंडोरा पिटत आहे, तो चुकीचा ठरतो.
कोणत्याही ऐतिहासिक घटनेचे महत्व स्वतःच्या नावे घेणे आणि श्रेय लाटणे हा एका वर्गाचा वारंवार खटाटोप राहिला आहे, त्याला शह देण्याचा निर्णय पुण्यातील भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने घेतला, त्याबद्दल या ट्रस्टच्या विश्वस्तांचे आम्हाला खास करून अप्रूप वाटते. टिळक हे मोठे नेते होते. राज्य आणि देशातील एक समूह त्यांचे नेतृत्व मानतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, पुणे महापालिका आणि खास करून टिळकांचे वंशज सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनकत्व टिळकांना देऊन निर्माण झालेल्या ऐतिहासिक वादावर पडदा टाकण्याऐवजी टिळकांची उंची कमी करण्याचा का प्रयत्न करत आहेत, तेच कळत नाही. टिळक जसे मोठे आहेत तसेच, भाऊ रंगारीही मोठेच आहेत. 1897 साली ब्रिटिश अधिकारी रँड याचा खून करताना त्याच्यावर पहिली गोळी कुणी चालवायची, याबाबत चाफेकरबंधू व भाऊसाहेब रंगारी, काशिनाथ ठकुजी जाधव यांच्यात चुरस निर्माण झाली होती, हा इतिहास आहे. भाऊसाहेबांचे ऐतिहासिक कार्य समाजापुढे का आणले जात नाही? चुकीचा व अयोग्य इतिहास समाजाला का सांगितला जातो? या प्रश्नाची उत्तरे दिली गेली पाहिजेत. गणेशोत्सवाचे यंदाचे वर्ष हे 126 वे असताना, निव्वळ चुकीचा इतिहास ठासविण्यासाठीच ते सव्वाशे वे वर्ष म्हणून जर सरकार आणि महापालिका जाहीर करत असेल तर तो नतद्रष्टपणा झाला. काळ संबंधितांना माफ करणार नाही. भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे व महापौर मुक्ता टिळक यांना पत्रही दिले होते. परंतु, या दोघांनीही ट्रस्टच्या पत्राला केराची टोपली दाखवली. स्वतःचे कोंबडे झाकून ठेवले म्हणजे सूर्य उगवणार नाही, असे तावडे व टिळक यांना का वाटते आहे तेच कळत नाही. सत्य इतिहास हा कधी तरी लोकांसमोर येणारच आहे. किंबहुना, तो आता पुढे आलाच आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? टिळक की भाऊसाहेब रंगारी? हा प्रश्न भावीपिढी विचारेल तेव्हा विचारेल; परंतु आता हा प्रश्न विद्यमान पिढी विचारतच आहे, त्याचे काय ते उत्तर योग्य त्या पुराव्यानीशी राज्य सरकार व पुणे महापालिकेने द्यायलाच हवे!