पुणे । तब्बल 2 कोटी रुपये खर्च करून महापालिका साजरा करत असलेला शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाचे बोधचिन्ह वादात सापडले आहे. केवळ महापालिका आणि गणपती यांचे चित्र असलेल्या बोधचिन्हावर लोकमान्य टिळक यांचे चित्र नसल्याने काँग्रेस आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. तर महापालिका खोटा इतिहास सांगत असल्याच्या कारणावरून भाऊ रंगारी मंडळ आंदोलन करणार आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
2016-17 हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे 125 वे वर्ष असल्याचे प्रमाण मानून पुणे महापालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवरी शनिवारवाडा येथे होणार आहे. मात्र त्या आधीच गणेशोत्सवाच्या बोधचिन्हावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
पालिकेचा निषेध
काँग्रेसचे शहरध्यक्ष रमेश बागवे यांनी याबाबत पत्रक काढून महापालिकेचा निषेध केला आहे. गणेशोत्सवाची 125 वर्षे साजरी करणे म्हणजे लोकमान्यांच्या उदात्त संकल्पनेचा विचार लोकांमध्ये रुजवणे, असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वातंत्र्याच्या एका पर्वाचे नेतृत्व करणार्या टिळक यांचा फोटो महापालिका बोधचिन्हावर नसणे ही बाब निषेधार्थ असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रकात केला आहे. याशिवाय शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष शाम देशपांडे यांनी लोकमान्यांनी घरोघर बसवला जाणारा गणपती चौकात आणल्याचे सांगितले.
पालिकेने दबावाला बळी पडू नये
पुणेकरांच्या खर्चाने होत असलेल्या या उत्सव प्रसंगी लोकमान्य टिळकांचा महापालिकेला विसर पडणे चुकीचे असल्याची टीका देशपांडे यांनी केली. याबाबत महापालिकेने कोणच्याही विरोधाला अगर दबावाला बळी पडू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.
टिळक पुतळा येथे आंदोलन
दुसरीकडे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने मात्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गणेशोत्सवाबाबत खोटा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप करून मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, महापालिका पदाधिकारी, महापौर, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष यांचा निषेध करण्यासाठी रंगारी ट्रस्टतर्फे शनिवारी टिळक पुतळा येथे आंदोलन करण्यात येणार आहे. भाऊसाहेब रंगारी हे 1892 सालचे गणेशोत्सवाचे एकमेव संस्थापक होते हे राज्यसरकारनेही मान्य केले आहे. त्या संदर्भानुसार मागील वर्षीच सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण झाली आहेत, असे ट्रस्टचे म्हणणे आहे.