पुणे । पहिल्या आठवड्यात अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर गणेशोत्सव जवळ आल्यावर अनेक मंडळांनी ऑनलाइन परवाने घेण्यास पसंती दिल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे सुरुवातीला गती कमी असली तरी शुक्रवारपर्यंत शहरातील 106 मंडळांनी ऑनलाइन तर केवळ 85 मंडळांनी ऑफलाइन परवाने घेतलेले आहेत.
अगदी शेवटच्या दिवसापर्यंत परवाने घेणे सुरूच
यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे गणरायाचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी महापालिकेने कंबर कसून जय्यत तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवादरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात परवानगी देण्याचे पोलीस यंत्रणा आणि महापालिकेने यापूर्वीच निश्चित केले होते. त्यानुसार महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष करत पारंपरिक ऑफलाइन पद्धतीला पसंती दिली होती. गेल्या आठवड्यापासून मात्र परिस्थिती बदलत असून ऑनलाइन परवाने घेणार्या मंडळांची संख्या वाढताना दिसत आहे. ऑफलाइन पद्धतीमध्ये प्रथम वाहतूक पोलीस त्यानंतर महापालिका आणि सर्वात शेवटी पोलिसांचे अंतिम संमती पत्र मिळाल्यावर परवानगी दिली जाते. मात्र ऑनलाइन अर्ज भरताना मंडळाला धर्मादाय आयुक्तांकडील नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक असल्याने नोंदणी नसलेल्या मंडळांना ऑफलाइनशिवाय पर्याय नाही. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत परवाने घेणे सुरू असल्याने मंडळे नक्की कोणत्या पद्धतीने परवाने घेण्याला प्राधान्य देतात, यासाठी 25 तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे.
यंदा ऑनलाइन पद्धतीने फक्त परवाने दिले जात आहेत. हा परवाना घेण्यासाठी मंडळांना कोणतीही रक्कम भरावी लागत नाही. मात्र पैसे भरून घ्यावी लागणारी रनिंग मंडप आणि कमानींची परवानगी घेण्याची सोय ऑफलाइन नसल्याने त्यासाठी मात्र मंडळांना पालिकेचे उंबरठे झिजवणे भाग आहे.
सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी आता ऑनलाइनचा लाभ अनेक मंडळे घेत आहेत. पहिलेच वर्ष असल्याने सर्व बाबींचा समावेश यंदा करता आला नसला तरी वेळ वाचवण्यासाठी जास्तीत जास्त मंडळांनी या पर्यायाचा वापर करायला हवा.
– नितीन सोनवणे, कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभाग