पुणे । गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, बाजारपेठ सजावट साहित्यांनी झगमगली आहे. बाप्पाच्या सजावटींसाठी वेगवेगळी पानं-फुलांची तोरणे, रंगीबेरंगी फुलांच्या अन् विद्युत रोषणाईच्या माळांनी बाजारपेठ फुललेली आहे. बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असल्याने मुख्य बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवाची तयारी महिनाभर आधीपासून भक्त करत असतात. घरी विराजमान होणार्या बाप्पांसाठी सर्वत्र तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. मंडई, लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, कर्वे रस्ता, माळवाडी, कोथरूड परिसरात रस्त्याच्या दुर्तफा विविध वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत नागरीक मनमुराद खरेदीचा आनंद घेत आहेत. श्रींच्या सजावटींसाठी यंदा बाजारात विविध गोष्टी दाखल झाल्या आहेत. मोत्यांची माळ, विविध रंगी फुलांची माळ, नेटचे पडदे, डिस्को लाइटचे बॉल, प्लॅस्टिकची फुले, वेली, लाइट इडक्शन कप, कंदील दिवे, पारंपरिक समई यांसारखे एकापेक्षा एक सुबक वस्तू अत्यल्प दरात बाजारात उपलब्ध आहेत.
फाउंटन, समई अन् छत्री
टेबल लॅम्प, फाउंटन दिवे, चिराग दिवा नव्याने बाजारात दाखल झाले आहे. त्याचबरोबर सजावटींच्या वस्तूंमध्ये यंदा नव्याने मखमली कापडापासून बनवलेली छोट्या आकाराची छत्री ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. या छत्रींची किंमत 100 रुपये आहे. केशरी, पिवळा, लाल, गुलाबी रंगामध्ये हलक्या वजनाच्या छत्र्या उपलब्ध आहेत.
मेणाच्या फळांना मागणी
गणपतीसाठी मेणापासून बनवलेली फळे बाजारात उपलब्ध आहे. त्यासोबत प्लॅस्टिकची फळे देखील आहे. हुबेहुब खर्या फळांप्रमाणे ही फळे दिसतात. यामध्ये सफरचंद, पेरू, चिक्कू, कणीस सर्वच फळांचा समावेश आहे. वेगवेगळी खेळणी, भातुकलीचे खेळ, प्राणी, पक्षी सजावटीसाठी खरेदी केल्या जातात.
फुलांच्या माळांना मागणी वाढली
बाजारात निळ्या, पिवळ्या, गुलाबी अन लाल अशा सप्तरंगी फुलांच्या माळांना मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे सजावटीसाठी पारंपारिकटच देण्यासाठी प्लॅस्टिकच्या झेडुंची फुलांच्या माळा देखील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सजावटीला साजेसे अशा वस्तू घेण्यात येत आहेत.
लाइटच्या माळा खरेदी करण्याकडे कल
सजावटीसाठी सर्वसामान्यांचा विद्युतरोषणाईचे दिवे, लाइट खरेदी करण्याचा कल जास्त असतो. प्रतिवर्षी चिनी बनावटीच्या विद्युत रोषणाई भारतात विक्रीसाठी आणल्या जातात. मात्र यंदा भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे यंदा ‘चायना मेड’ विद्युत रोषणाईकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. चिनी बनावटीच्या मालाची विक्री अत्यंत कमी झाली असून नागरीक भारतीय बनावटीच्या विद्युत रोषणाई खरेदी करण्यावर भर देत आहेत. ही झुंबरं सर्वसामान्यांना परवडतील अशा माफक दरात मिळत आहेत. झुंबर हा प्रकार जुना आहे मात्र त्यामध्ये आधुनिक साज लावल्याने गणपतीसाठी याची खरेदी वाढली आहे.