गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजपचे ब्रॅडींग

0

पुणे । गणेशोत्सावाचे निमित्त करून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी स्वपक्षांचे ब्रँडींग करत असल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केला. पैशांसाठी प्रायोजक शोधण्याची जबाबदारी अधिकार्‍यांना दिली असल्याची टीका त्यांनी केली. महापौरांनी मात्र हे आरोप धुडकावून लावले असून विरोधकांनी किमान गणेशोत्सवात तरी राजकारण आणू नये, असे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे गटनेचे अरविंद शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की भाजपाकडून पैशांची उधळपट्टी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थायी समितीने अंदाजपत्रकात 2 कोटी रुपये उत्सवासाठी मंजूर केले असताना 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी अधिकार्‍यांना वेठीस धरण्यास येत आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यासाठीच बुधवारी बांधकाम, मिळकत कर, आकाशचिन्ह अशा आर्थिक विषयांशी संबधित विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना प्रायोजक शोधण्याची जबाबदारी दिली आहे, असा आरोप दोन्ही पदाधिकार्‍यांनी केला.

ही केवळ उधळपट्टी
उत्सवाचे नियोजन बैठकीत 2 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरले आहे. त्या बैठकीला आम्हाला बोलावले होते, मात्र त्यानंतर उत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीला विरोधी पक्षांना बोलवण्यात आले नाही. त्यामुळे त्यात काय ठरले हे माहिती नाही. हे कार्यक्रम म्हणजे एकप्रकारची उधळपट्टीच आहे व त्याला आमचा विरोध आहे, असे तुपे आणि शिंदे यांनी सांगितले. स्थायी समितीने मंजूर केलेल्या खर्चातच उत्सव व्हावा, हवे तर स्थायी समितीकडून आणखी पैसे अधिकृतपणे वाढवून घ्यावेत, मात्र अधिकार्‍यांना प्रायोजक शोधण्याची जबाबदारी देऊ नये अशी मागणी तुपे, शिंदे यांनी केली.

125 की 126 हा वाद मिटवावा
सार्वजनिक गणेशोत्सावचे यंदाचे 125 की 126 वर्ष आहे, हा वाद महापौरांनी मिटवावा. किंवा मग वर्ष कोणते आहे, त्याचा उत्सव साजरा करताना उल्लेखच करू नये. श्रीमंत भाऊ रंगारी यांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. राज्य सरकारनेच प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते असा उल्लेख असतानाही ते टाळणे अयोग्य आहे, असे तुपे व शिंदे म्हणाले.