नवी मुंबई : गणपती आणि हरतालिका तृतीया च्या पार्श्वभूमीवर एपीएमसी फळ मार्केट बहरले असून बुधवारी फळांची आवक वाढल्याचे दिसून आले. रोजच्या तुलनेत गाड्यांची आवक वाढली असली तरी फळांचे दर मात्र स्थिर होते. शुक्रवार पासून दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी आवक मात्र वाढणार नसल्याचे फळ मार्केट मधील व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले.
शुक्रवारी गणपतीचे आगमन होत असून त्या दिवशी सर्वत्र गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी मोठ्या प्रमाणात फळांची उलाढाल होणार आहे. मुख्य पूजेत सफरचंद,डाळींब,चिकू,सीताफळ व केळी या फळांचा वापर होत असल्याने त्या दिवशी या फळांना मागणी वाढणार आहे.त्या तुलनेत गेल्या दोन दिवसांपासून फळांची आवक वाढली असून त्यात शुक्रवारी सकाळी अजून वाढ होणार असल्याचे पानसरे यांनी सांगितले. सफरचंदाची आवक वाढली असून बुधवारी तब्बल ५० गाड्यांची आवक एपीएमसी फळ मार्केट मध्ये झाली. त्यामुळे भावही स्थिर होते.इतर दिवसांच्या तुलनेत बुधवारी बाजारात १०० रुपये किलोने सफरचंदाची विक्री झाली.त्यामुळे ऐन गणेशोस्तवात नागरिकांना सफरचंद कमी भावाने मिळाले.केळी ची आवक महाराष्ट्रातून होत असल्याने त्याच्याही आवक मध्ये वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीचे सीताफळ बाजारात ५०० रुपये डझन ने विकण्यात आले. तर चिकू ८ डझन ५०० रुपयांने विक्री झाला.इतर राज्यातून सफरचंदाची आवक कमी होत असल्याने यंदा मात्र हिमाचल मधून मोठ्या प्रमाणात सफरचंदाची आवक झाली असल्याचे यावेळी पानसरे यांनी सांगितले. बुधवारी २०० ते २५० गाड्यांची आवक बाजारात झाली असून त्यात वाढ होण्याची शक्यात असल्याचे पानसरे यांनी सांगितले