पुणे : गणेशोत्सवातील खर्चाच्या मुद्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि शिवसेना या मित्र पक्षातच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि घोषणाबाजी झाली. हा गोंधळ चालू असताना विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी तटस्थ भूमिका घेतली.
गणेशोत्सवाचे यंदाचे 125 वे वर्ष महापालिकेकडूनही साजरे केले जात आहे. याकरिता 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून भारतीय जनता पक्ष मिरवून घेत असल्याचा आक्षेप सर्व विरोधी पक्षांनी घेतला आहे. सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले. शिवसेनेचे संजय भोसले यांनी उत्सवातील खर्चाचा मुद्दा उपस्थित केला आणि सत्ताधारी पक्ष उधळपट्टी करत असल्याचा आरोप केला. शिवसेनेच्या सभासदांनी सभेत गणपतीची मूर्ती आणून आरती केली.
दरम्यान भाजप आणि शिवसेना सभासदांनी एकमेकांविरोधात हाय हाय अशा घोषणा दिल्या. भाजपने प्रत्युत्तर म्हणून गणपतीची आरतीही म्हटली. सुमार दहा मिनिटे हा गोंधळ चालू होता, अखेरीस महापौरांनी सभा तहकूब केली. गणेशोत्सवाचे जनक कोण? या वादाचे सावट महापालिकेच्या उत्सवाच्या उद्घाटन सोहोळ्यावर होते. आता उत्सवातील पैशांच्या उधळपट्टीवरून टीका सुरू झाली आहे. या टीकेत शिवसेना सहभागी झाल्याने भाजपची अडचण झाली आहे. प्रत्येक वेळी आंदोलनाला पाठिंबा देणार्या विरोधीपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र तटस्थ राहणे पसंत केले. त्यामुळे कुठे तरी शिवसेना या आंदोलनात एकाकी पडल्याचे दिसून आले.