गणेशोत्सवातील निर्माल्यापासून सात्विक सेंद्रीय खताची निर्मिती

0

प्रा.डॉ.दयाधन राणेंचा अभिनव उपक्रम : फुलझाडांच्या कुंड्यांमध्ये टाकणार निर्माल्यापासून तयार झालेले सेंद्रीय खत

भुसावळ- शहरातील मोरेश्वर नगरातील मोरेश्वरनगर मित्र मंडळाने स्थापित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात शहरातील अन्य मंडळांचे तसेच घरगुती गणेशोत्सवाचे निर्माल्य संकलीत करुन सेंद्रीय खत निर्मितीचा अभिनव प्रयोग राबवला जात आहे. शहरातील दादासाहेब देविदास भोळे महाविद्यालयातील प्रा.डॉ.दयाधन राणे यांनी या प्रयोगाची सुरवात केली असून निर्माल्यापासून तयार होणारे सात्विक सेंद्रीय खत परिसरातील नागरिकांच्या घरात असलेल्या फुलझाडांच्या कुंड्यांमध्ये टाकले जाणार आहे.

प्रायोगिक तत्वावर सात्विक सेंद्रीय खत प्रकल्पाची सुरूवात
शहरात सध्या विविध भागांमध्ये सार्वजनिक तर घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. दररोज पुजेसाठी हार, फुले, आरासासाठी वापरली जाणारी फुले यांचे नंतर निर्माल्यात रुपांतर होते. हे निर्माल्य संकलीत करुन अनंत चतुर्दशीला नदीपात्रात विसर्जीत केले जाते. निर्माल्याची हाताळणी व्यवस्थीत न झाल्यास त्याची कुजण्याची प्रक्रिया होऊन दुर्गंधी पसरते. याच प्रक्रियेत तयार झालेले कृमी व किटक निर्माल्यातून थेट नदीपात्रात जातात. यामुळे जलप्रदूषण वाढून नदीच्या पाण्याचे पावित्र्यही नष्ट होते. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी निर्माल्य व्यवस्थित हाताळणी व्हावी, श्रध्दा आणि भक्तीने युक्त निर्माल्याचे कसदार सेंद्रीय खतात रुपांतर व्हावे, यासाठी शहरातील प्रा. द्याधन राणे यांनी प्रायोगिक तत्वावर सात्विक सेंद्रीय खत प्रकल्पाची सुरूवात केली आहे. या प्रकल्पात निर्माल्याचा योग्य तो सन्मान आणि आदर व पावित्र जोपासून गाईचे शेण व गोमुत्राचा संयुक्त वापर करुन निर्माल्याचे शास्त्रीय पध्दतीने सेंद्रीय खतात रुपांतर केले जाणार आहे. ही सात्विक सेंद्रीय खताची निर्मितीची पध्दत पूर्णपणे शास्त्रीय प्रक्रियेतूनप होऊन वैज्ञानिक तत्वांव्दारे अ‍ॅझोटोबॅक्टर या जिवाणूंचे संवर्धन करून खताची निर्मिती होईल.

दररोज होतेय संकलन
या प्रकल्पासाठी भुसावळ शहरातील मोरेश्वरनगर येथील मोरेश्वर नगर मित्र मंडळाने स्थापित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवव मंडळाकडून प्रा. आर. डी. पवार यांचे मार्फत दररोज नियमित निर्माल्य प्रा. डॉ. द्याधन राणे यांच्याकडे सुपूर्त केले जात आहे. गोमुत्र, गाईचे शेण व जिवाणू कल्चर यांच्या माध्यमातून या निर्माल्याचे सात्विक खतात रुपांतर केले जाणार आहे.

बीआयएसएलडीचे तांत्रिक सहकार्य
प्रकल्पासाठी मुंबई येथील शाश्वत उपजिविका अर्थात सस्टेनेबल लाईव्ह लिइडसाठी कार्य करणार्‍या बी.आय. एस. एल. डी. इन्सिट्यूटमध्ये मास्टर इन पब्लिक हेल्थ या पदावर कार्यरत असणार्‍या प्रा. डॉ. वैभव दतरंगे यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत आहे. यंदा शहरात प्रायोगिक तत्वावर होणारा हा अभिनव प्रयोग पूढील वर्षी व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे.

भक्तीलहरी कायम राहतील -प्रा.राणे
निर्माल्यात पूजेदरम्यान भाविकांच्या भक्ती लहरी निर्माण होतात. निर्माल्याचे विसर्जन केल्यानंतर या लहरीसुध्दा विसर्जीत होतात. या निर्माल्याचे रुपांतर सेंद्रीय सात्विक खतात केल्यास या शुभलहरी खतांच्या माध्यमातून आपल्या परीसरातील झाडांच्या कुंड्यांमध्ये टाकल्या तर श्रध्दा आणि भक्तीच्या लहरी वर्षभर आपल्या सोबत राहतील. यातील सकारात्मक वातावरण आणि उर्जा आपल्याला मिळत राहिल, असे भोळे महाविद्यालयातील भौतीकशास्त्र विभागाचे प्रा.दयाधन राणे ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.