गणेशोत्सवातून सामाजिक जनजागृतीवर भर

0

धुळे। महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. गणरायाची स्थापना होऊन आठवडा उलटला. गणेशोत्सव हे सार्वजनिक उत्सव असल्याने सामाजिक जनजागृतीचे ते एक माध्यम आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर गणेश मंडळातर्फे सामाजिक जनजागृती करण्यात येत आहे. देशाला भेडसावणार्‍या सद्यस्थितीवर गणेशोत्सवाच्या माध्यमातून भाष्य करण्यात येत आहे. गणेश मंडळांनी विविध देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनात्मक विषयावर जनजागृती करणारे सजीव देखावे सादर केले आहे. शहरातील भगवा चौक गणेश मंडळांनी खान्देशची लोकधारा हा सजीव देखावा साकारला आहे. तर नवमहाराष्ट्र गणेश मंडळांनी महाभारतातील पौराणिक प्रसंगावर भाष्य केले आहे. श्री पवनपूत्र गणेश मंडळांनी खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती तयार केली आहे.

’बेटी बचाओ- बेटी पढाओ’
श्री राणा प्रताप गणेश मंडळाने सध्या स्थितीतील पाच विषयावर भाष्य करणारा सजीव देखावा लोकांना आकर्षित करून घेत आहे. कटपुतली व जादुगर या खेळाद्वारे ’बेटी बचाओ- बेटी पढाओ’ या विषयावर जनजागृती करणाचा प्रयत्न भांग्यामारोती गणेश मंडळाने केले आहे. प्रबोधनात्मक देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठया प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत.

खानदेशीय संस्कृतीला उजाळा
कानुबाई उत्सव, आई एकविरा देवी, गडावरील सप्तश्रृगीची पायी यात्रा, अक्षय तृतीया, आदिवासी संस्कृती यातुन खान्देशातील संस्कृतीचे दर्शन घडविले जात आहे. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, स्वच्छता, मोबाइलचा गैरवापर या विषयावर जनजागृती केली जात आहे. मंडळांला 15 वर्षे पूर्ण होत असून मंडळाचे युवासेना अध्यक्ष पंकज गोरे, मंडळ अध्यक्ष सागर गोरे, उपाध्यक्ष राम परदेशी उपक्रमासाठी प्रयत्न करीत आहे. कलाकार डी.के.डान्स गृपचे असून यात दिपक साळुंखे, रविराज पवार, भूषण संसारे, धीरज गवळी, गणेश सकट, रिंकू गोसावी, निशा सकट ,धनश्री बगले, प्रदिप पवार, भावेश अहिराव आदींचा समावेश आहे.

आरोग्य शिबीर
पवनपूत्र गणेश मंडळांनी धुळ्यातील आई एकवीरा देवी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. या मंडळाला 42 वर्षे पूर्ण होत आहे. दरवर्र्षी मंडळाकडून विविध सामाजिक, पौराणिक, प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात. होळी, नवरात्र, शिवजयंती उत्सव सोबतच आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, यासारख्या सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे गौरव पवार यांनी सांगितले.

धर्म अधर्मवर भाष्य
नव महाराष्ट्र मित्र मंडळाचे 63 वे वर्ष सुरु आहे. या मंडळाचे अध्यक्ष मुस्लीम धर्माचे असून हिंदू मुस्लिम जातीय सलोखा बनून रहावा यासाठी प्रत्येक वर्षी या ठिकाणी सामाजीक, सांस्कृतीक उपक्रमातून संदेश देणारे कार्यक्रम घेण्यात येत आहे. शेख हारून शेख मंडळांच्या अध्यक्ष तर किशोर देशपांडे, ललीत मराठे उपाध्यक्ष आहेत. कुभकर्ण व विभिषन या दोन्ही भाऊ मधील धर्म अधर्म या विषयावर राम, लक्ष्मण, हनुमान, जांभुवत, यांच्या आकर्षक मूर्तींचा देखावा साकारला आहे.

ज्वलंत विषय
राणा प्रताप गणेश मंडळांनी या वर्षी नागरिकांना भेडसावणार्‍या ज्वलंत विषयावर भाष्य करणारा सजीव देखावा साकारला आहे. त्यात शेतकरी आत्महत्या, नोटबंदी, पर्यावरण, जीएसटी, चीन व काश्मीर प्रश्न यासारखे विषयांचे मिश्रण करून हा प्रयोग 18 मिनिटात मांडण्यात आला आहे. श्रीमंत भांग्यामारोती गणेश मंडळाला 72 वर्षाची परंपरा आहे. वर्षभर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, या सारख्या अनेक उपक्रम राबविले जात असल्याचे प्रथम महापौर भगवान करनकाळ यांनी सांगितले.