भुसावळ। समाजातील उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गणेशोत्सवादरम्यान पाच दिवस समर्पणाची दुर्वा अर्पण करण्याचा निर्धार ‘अंतर्नाद प्रतिष्ठान’ने केला असून गरजू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाचा गणेशोत्सव ‘अंतर्नाद प्रतिष्ठान’ने दूरदृष्टिकोनातून साजरा करण्याचा दृढ निर्धार केला आहे. दररोज शहरातील एक गरजू शाळा निवडून त्या ठिकाणी अध्ययन करणारे गोरगरीब विद्यार्थी हुंडकायचे. त्यांना पाटी, वह्या, दप्तरे, पेन, पेन्सील, कंपासपेटी, गणवेश अशा कोणत्या शैक्षणिक साहित्याची गरज आहे, त्याची नोंद करायची आणि त्यांना दात्यांनी केलेल्या मदतीतून पुरवायचे, असा हा ‘समर्पण गणेशोत्सव’ आहे. त्याची मुहूर्तमेढ गणेशचतुर्थीला करणार आहोत. यात सहभागी होऊन गरजूंना मदत करु इच्छिणार्यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधावा.