गणेशोत्सवात केळीवर आली मंदीची लाट

0

उत्पादक संकटात; रावेर येथे केळी भावात फरकासहीत घसरण

भुसावळ । केळीवर मंदीची लाट आल्याने केळी उत्पादक संकटात सापडले आहेत. गणेशोत्सवाला सुरुवात होताच केळी भावात घसरण सुरू झाली आणि आता तर 1 रोजी केळी भावात झाली तर फरक 20 वरुन 18 रुपये करण्यात आला तर रावेर येथे केळी भाव 1 हजार 50 रुपये क्विंटल फरक 18 असे घसरले. गेल्या श्रावण महिन्यात केळी भावात चांगली वाढ होवून भाव 1 हजार 275 रुपये क्विंटल फरक 20 असे वाढले. केळी मागणीत वाढ झाल्याने भावात चढ-उतारही झाली मात्र भाव टिकून राहिले. मात्र श्रावण महिना संपत असतांना केळी भावात घसरणीला सुरुवात होवून अवघ्या तीन आठवड्यात केळी भावात फरकासहीत 237 रुपयांनी घसरण झाली.

उत्पादक सापडला आर्थिक संकटात
एकीकडे केळी भावात घसरण तर दुसरीकडे पाऊस आणि पूरस्थितीमुळे केळी निर्यातीवर विपरीत परिणाम होत आहे. व्यापारी उठाव नसल्याचे कारण सांगून केळी घेण्यास नकार देत आहे. याचाही विपरीत परिणाम केळी भाव घसरणीवर होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय सफरचंद, डाळिंब व इतर फळांची आवक वाढल्याचा परिणामही केळी भाव घसरणीवर होत आहे. अशा स्थितीत कमी भावात मागणी सुरुच आहे. एकीकडे भावात घसरण होत असतांना कमी भावात मागणीचा फटकाही उत्पादकांना बसत आहे. एकंदरीत केळीवर मंदीची लाट आल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.