गणेशोत्सवात गुन्हेगार होणार हद्दपार

0

भुसावळ । गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उपद्रवींवर गणेशोत्सवाच्या काळात मोक्कासह हद्दपारी तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी येथे दिली. पोलीस उपअधीक्षक कार्यालयात शुक्रवारी दुपारी त्यांनी पत्रकार परीषद घेतली. ते म्हणाले की, आगामी गणेशोत्सवासह बकरी ईद सण उत्साहात साजरे करण्यासाठी विभागातील पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली.

उपद्रवी होणार हद्दपार
गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तींची पोलिसांकडून कुंडली काढण्यात येत असून अनेकांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत तसेच काहींवर मोक्का (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. सण-उत्सव साजरे करण्यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर शहरात बंदोबस्त राखला जाणार असून शहरातून रूट मार्चही काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

छेडखानीला आळा घालण्यासाठी विशेष पथक
उत्सवाच्या काळात तरुणींसह महिलांची होणारी छेडखानी थांबवण्यासाठी विशेष पथक गठीत करण्यात येणार असल्याची माहिती बच्चन सिंग यांनी दिली. ते म्हणाले की, या पथकात दोन महिलांसह चार पोलीस कर्मचारी तसेच 10 ते 15 स्वयंसेवक नियुक्त असतील. या स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण पोलिसांकडून देण्यात येईल. तसेच त्यांना टी शर्टही पुरवण्यात येतील. शहरातील विविध मंडळांमध्ये जावून हे पथक छेडखानी करणार्‍यांवर कारवाई करतील. सहाय्यक पोलीस निरीक्षक सारीका खैरनार यांच्या नेतृत्वात हे पथक काम करेल.

’आरएफआयडी’ ने गस्त
एरव्ही पोलिसांच्या गस्तीबाबत होणारी ओरड आता थांबणार आहे. आरएआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन) टेक्नॉलॉजीचा नागरिकांच्या सहकार्यातून पोलीस आता वापर करणार आहेत. थम्ब पद्धत्तीवर आधारीत असलेल्या या मशीनमुळे कुठल्या भागात कुठल्या कर्मचार्‍याने गस्त केली आहे वा नाही तसेच केव्हा केव्हा या भागात गस्त घालण्यात आली याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षकांना कळणार आहे. गुड मॉर्निंग, दामिनी व निर्भया पथकाच्या कारवाईची मॉनिटरींगही त्यामुळे शक्य होईल, असे बच्चनसिंग म्हणाले. दररोजची माहिती यामुळे अधिकार्‍यांना मिळणे सोयीचेही होणार आहे.

घरबसल्या नोंदवा तक्रार
विविध कारणांनी पोलीस ठाण्याची पायरी नागरिक चढत असलेतरी अनेकदा त्यांना मनस्तापच अधिक सोसावा लागतो शिवाय परजिल्ह्यात काही अप्रिय घटना घडल्यास जाण्या-येण्याचा वेळ व पैसा खर्च होत असल्याने मोठा मनस्ताप सोसावा लागतो मात्र नागरिकांच्या अडचणीची दखल घेत पोलीस खात्याने एक पाऊल पुढे टाकत सिटीजन पोर्टल सुरू केले आहे. संगणकाच्या एका क्लिकवरून नागरिकांना आपला लॉगीन आयडी उघडून तक्रार नोंदवता येणार आहे. ही तक्रार त्या-त्या ठाण्याच्या सीसीएनएस प्रणालीशी जोडली जावून अधिकारी पडताळणीनंतर तक्रारीची दखल घेणार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारींची एफआयआर आपल्याला घरबसल्या पाहता येणार आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सुरू असून लवकरच त्याबाबत आढावा घेण्यात येईल.

इमारतीचे लवकरच उद्घाटन
तालुका पोलीस ठाण्यासह उपअधीक्षक कार्यालय व नियंत्रण कक्षाच्या इमारतीचे या महिन्यात उद्घाटन होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी प्रसंगी दिली. ते म्हणाले की, तूर्त या इमारतीत नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे शिवाय इमारतीची रंगरंगोटी तसेच फर्निचर आदी कामेदेखील पूर्ण करण्यात आली आहे. तीन कार्यालये एकाच इमारतीच्या छताखाली एकत्र येण्यास त्यामुळे मदत झाली आहे.