गणेशोत्सवात डागडूजी केलेल्या रस्त्याची पुन्हा दुरवस्था

0

भुसावळात वाहनधारकांना मान व पाठीचा त्रास वाढला

भुसावळ- शहरात पालिकेने गणेशोत्सवादरम्यान मिरवणूक मार्ग, जळगावरोड व हंबर्डीकर चौक परीसरातील रस्त्यांची डागडूजी केली होती मात्र अवघ्या सहाच महिन्यात रस्त्यांची वाताहत झाल्याने या कामावर झालेला खर्च वाया गेला आहे शिवाय खरा रस्त्यांमुळे वाहनधारकांना पाठीसह मानेचा त्रास जाणवत असल्याने त्यांच्यातून पालिकेच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

खड्ड्यांमुळे मोडला वाहनधारकांच्या पाठिचा कणा
पालिका प्रशासनाने गणेशोत्सवाच्या दरम्यान जळगावरोड, यावलरोडचा काही भाग, मुख्य मिरवणूक मार्ग आदी रस्त्यांच्या डागडूजीचे काम हाती घेतले. मात्र शहरातील रस्त्यांची स्थिती पुन्हा बिकट झाली आहे. मुख्य बाजारपेठेतील नृसिंह मंदिर ते अप्सरा चौक, मरीमाता मंदिर, मोठी मशिद, सराफ बाजार या रस्त्याचीही स्थिती विदारक आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपूर्वी करण्यात आलेला गांधीचौक ते पालिकेपर्यंतचा मॉडर्न रोडवर वेगळी स्थिती नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, नगरपालिका ते खडका चौफुलीपर्यंतचा मार्ग आदी रस्त्यांवर चालणेही कठीण झाले आहे. पालिकेकडून नवीन रस्ते तर सोडाच, पण साधी डागडूजीदेखील केली जात नसल्याने वाहनधारकांच्या संतापाचा पारा वाढला आहे. शहरातून टिका होत असतानाही प्रशासन गप्प असल्याचे दिसून येते. नव्यानेच झालेल्या मामाजी टॉकीज रस्त्यावरही धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे पालिकेने तयार केलेल्या पहिल्याच ट्रिमिक्स रस्त्याचे आता बारा वाजले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांच्या पथकाकडून तपासणी झालचे समजते मात्र पुढे काय झाले? हे कळू शकले नाही.