भोर- गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव असून, या काळात न्यायालयाच्या निर्देशानुसारच कायद्याच्या चौकटीत राहून कोणालाही ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही, याची खबरदारी डीजे चालक-मालकांनी घेऊन गणेशोत्सव काळात पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी डीजे चालक-मालकांच्या आयोजित बैठकीत केले आहे.
हाके म्हणाले, गणेशोत्सव काळात डीजे वाजवण्यास नियमानुसार बंदी आहे. तरीसुद्धा अनेकवेळा ते वाजवले जातात. मात्र 50 डेसिबलची आवाजाची मर्यादा असून त्यापुढे आवाज जाता कामा नये. या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी लागेल. या नियमांचे पालन सर्व डीजे चालक-मालकांनी करावे आणि पोलिसांना सहकार्य करून येणारा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीला भोर शहर आणि परिसरातील 13 डीजे चालक-मालक आणि पोलीस कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.