तळेगाव : गणेशोत्सव काळात 55 डेसिबलपेक्षा अधिक कर्णकर्कश आवाज ठेवणे, मद्य पिणे किंवा इतर अशोभनीय कृत्य खपवून घेतली जाणार नाहीत. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करा. कायद्याच्या चौकटीत राहून उत्साही व आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करा. नियमांची पायमल्ली केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिला. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, सहाय्यक निरीक्षक गणेश लोकरे, देसाई, सहाय्यक गटविकास अधिकारी अप्पासाहेब गुजर, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश विनोदे, सचिन शिंदे, प्रा. महादेव वाघमारे, पोटोबा देवस्थानचे विश्वस्त अनंता कुडे, मंगेश खैरे, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, मयुर ढोरे, तुषार वहिले, दिलीप म्हाळसकर, शेखर वहिले, महावीर दुबे, अब्दुल शेख आदी उपस्थित होते. यावेळी मयुर ढोरे, अनंता कुडे, अतुल राऊत, तुषार वहिले, महावीर दुबे, आदींनी सूचना मांडल्या. प्रास्ताविक गणेश विनोदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महादेव वाघमारे यांनी केले. आभार सहाय्यक गटविकास अधिकारी अप्पासाहेब गुजर यांनी व्यक्त केले.
कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची
पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर म्हणाले की, शहरातील गणेशोत्सवात मुस्लिम बांधवांचादेखील सक्रिय सहभाग असतो. यातून सामाजिक एकोपा जपण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव लोकाभिमुख व पर्यावरणपूरक होईल, यादृष्टीनेदेखील शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे प्रयत्न करीत आहेत, असे म्हाळसकर यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी, गणेशोत्सव काळातील वाहतूक व्यवस्था, रस्त्यातील खड्डे, विसर्जन मिरवणुकीतील नियोजन याबाबत मार्गदर्शन करून उत्सव साजरा करताना कायद्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यादृष्टीने मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य करून गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करता येईल, असे आवाहन त्यांनी केले.