प्रांताधिकारी हेमंत निकम यांचे आवाहन
बारामती । गणेशोत्सव काळात तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिल्या. गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली बारामती तहसील कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. तहसिलदार हनुमंत पाटील, शहर पोलिस निरीक्षक विजय जाधव, ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेशसिंह गौड, सहाय्यक अभियंता विश्वास ओव्हाळ, महावितरण विभागाचे देवकाते, नगरपालिका व विविध विभागाचे शासकीय अधिकारी, गणेश मंडळाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.
24 तास अॅलर्ट रहा
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था चोख राखली जावी. तालुक्यातील जास्त लोकसंख्येच्या गावात प्रशासनातील संबंधित गावाचे तलाठी, सर्कल, पोलिस पाटील, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, शाखा अभियंता, वायरमन यांनी 24 तास अॅलर्ट रहावे. शहर व तालुक्यातील गणेश मंडळांचे मंडप व स्टेजच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके नेमण्याच्या सूचना निकम यांनी दिल्या. त्यांमार्फत मंडपाची तपासणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
खड्डे, चिखल होणार नाही याची दक्षता घ्या
अत्यावश्यक सेवेसाठी विर्सजन काळात अॅम्ब्युलन्स व अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कॅनॉल कडेला बरॅक लावावेत. गणपती विर्सजन मार्गावरील रस्ते खड्डे व चिखल होऊ नये, याची दक्षता घ्यावी. गणेश मंडळ प्रतिनिधींना वीज कनेक्शन घेण्यासाठी अवगत करावे. ग्रामपंचायत हद्दीतील गणेशमंडळांला दिलेल्या परवान्यांची एक प्रत तहसिल कार्यालयाकडे जमा करण्यास निकम यांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभागाने गणेशोत्सव काळात अवैध दारु निर्माण स्त्रोत नष्ट करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना तहसिलदार पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच विर्सजन काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.