पुणे । बाप्पांच्या आगमनास अवघ्या काही दिवसांचा अवधी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यात प्रसिद्धी पावलेले पेणच्या 15 लाख गणेशमूर्ती निरनिराळ्या राज्यात निरनिराळ्या रुपात रवाना होत असून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या शहरांमध्ये दाखल झाल्या आहेत. पुण्यातील बर्याचशा स्टॉलवर गणेशमूर्ती आतापासून विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
यंदाच्या वर्षी गणेशमूर्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तब्बल 20 कोटींची उलाढाल होणार असल्याने गणपती कारखान्यांमधील कारागीर खूष आहेत.
किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किंमतीत 12 टक्के वाढ केल्याने गणपती करखानदारांची थोडी आर्थिक अडचण झाली आहे. त्यात रंगांमध्येही कमालीची वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किंमतींमध्ये 20 ते 25 टक्के वाढ करण्यात आली. तरीसुद्धा मूर्तींच्या मागणीमध्ये गतवर्षीपेक्षा दोन लाखांची वाढ झाली आहे.
कारागिरांची धावपळ
अमेरिका, इंग्लंड, मॉरीशस, द. आफ्रिका आणि आखाती देशात पेणमधील कारखान्यातील सात हजाराहून अधिक मूर्ती दोन महिन्यांपूर्वीच रवाना झाल्या आहेत. शहरातील 400 पेक्षा जास्त कारखान्यांमध्ये पेणच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. त्यामुळे कारागिरांची धावपळ सुरू आहे. तब्बल 100 वर्षांपूर्वीपासून गणेशमूर्ती घडविण्याचे कारखाने सुरू झाले. सुरुवातीच्या काळात मातीच्याच मूर्ती तयार केल्या जायच्या. कालांतराने प्लास्टर ऑफ पॅरीस गुजरातमधून येण्यास सुरुवात झाल्यानंतर काही कारखानदारांनी मातीच्या गणेशमूर्तींऐवजी पीओपीला पसंती दिली.