गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्ते दुरुस्तीबाबत मंत्रालयात वॉर रुम

0

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर- गणेशोत्सवानिमित्त कोकणात लाखो कोकणवासीय जातात. त्यांना सुविधा मिळण्यासाठी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची सचिव स्तरावर पाहणीकरण्यात आली आहे. रस्ते दुरुस्तीबाबत त्यांनी आराखडा दिला असून त्यासाठी मंत्रालय स्तरावर वॉर रुम स्थापन करण्यात येत आहे. त्याठिकाणी दुरुस्तीबाबत दररोजआढावा घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली.

सदस्य राजेश क्षीरसागर यांनी सांगली जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्न विचारला होता, यावेळी झालेल्या चर्चेत श्री. पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील प्रश्नांबाबत श्री. पाटील म्हणाले, येथील सात कामांपैकी दोन कामाच्या निविदा अंदाजपत्रिकेतील किंमतीपेक्षा कमी दराच्या असून पाच कामाच्या निविदा जवळजवळ अंदाजपत्रिकेतील दराच्या आहेत. अंदाजपत्रिकेतील किंमतीपेक्षा कमी दराच्याबाबत 10टक्क्यापेक्षा खाली दर आल्यास तेवढी अनामत रक्कम घेतली जाते. तसेच आपण संबंधितांकडून पाच वर्ष देखभाल दुरुस्तीची हमीही घेतो. तथापि तेथील कामांच्याबाबत पुन्हा चलन तपासणी करुन चौकशी केली जाईल.

यावेळी झालेल्या चर्चेत राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, अमल महाडीक,निलेश राणे यांनी सहभाग घेतला.