अलिबाग : गणेशोत्सवानिमित्त अनेक चाकरमनी हे कोकणात जाण्यास सुरुवात झाली आहे. यानिमित्त मुंबई गोवा हायवेवर होणाऱ्या वाहतूकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले असून या महामार्गावरिल महत्वाच्या अशा 18 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून सुमारे 400 पोलीस कर्मचा-यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासियांचा महत्वाचा सण मानला जातो. यासाठी मुंबई, ठाणे, नवीमुंबई येथून अनेक चाकरमनी हे कोकणातील आपल्या घरी जात असतात. यामुळे, मुंबई गोवा हायवेवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुमारे 145 किलोमीटरच्या मार्गावर सुमारे 400 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तर, रायगड जिल्ह्यातील या मार्गावरील सुमारे 18 ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून यामुळे वाहतुक नियंत्रणासाठी मदत होणार आहे. तर, मुंबई गोवा हायवेच्या या मार्गावरील रहदारीच्या महत्वाची ठिकाण असलेल्या खारपाडा,हमरापुर, पेण, वडखळ समवेत महत्वाच्या ठिकाणी पोलिस चौक्यांसह, अँब्युलन्स आणी क्रेनचीसुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईसह इतर ठिकाणांहून प्रवास करणा-या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीवर नजर ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत पेण तालुक्यातील हमरापुर फाट्यावरील मदत केंद्रात 2 सिसिटिव्ही, पेण – खोपोली बायपास 3, रामवाडी चौकी 2 असे पेण तालुक्यात 7, माणगाव तालुक्यातील इंदापूर स्टँण्डवर 3, महाड शहरातील नातेखिंड मदत केंद्रात 3, विसावा हॉटेल परीसरात 2 तर पाली येथे 3 असे एकूण 18 ठिकाणी हे सिसिटिव्ही कॅमेरे वालण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात एकूण 274 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर 98 हजार 670 खाजगी गणपती आहेत आणि 13 हजार 372 ठिकाणी गौरी स्थापना होते. गणेशोत्सव काळासाठी जिल्ह्यातील पोलीसबळा व्यतीरिक्त होमगार्ड्स व राज्य राखीव दलाची मदत घेतली जाणार आहे.