नंदुरबार । गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या प्रदर्शनीला पहिल्या दिवसापासूनच उदंड प्रतिसाद मिळत असून शेकडो गणेशभक्तांनी या प्रदर्शनीला भेट देणे सुरु झालेल आहे. नंदुरबार शहरातील सोनार वाडी येथे 4 सप्टेंबर पर्यंत ही प्रदर्शनी चालू राहणार आहे. हिंदु जनजागृती समिती दरवर्षी गणेशोत्सव काळात गणेशोत्सव कसा असावा आणि कसा असू नये या विषयी वेगवेगळ्या मार्गाने व वेगवेगळ्या स्वरुपात जनप्रबोधन व जनजागृती करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून फ्लेक्स प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाच्या नावाखालील अपप्रकार थांबवा
नंदुरबार शहरातील मानाचा दादा गणपती जवळील सोनारवाडी येथे ही प्रदर्शनी 4 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सनातन संस्थेच्या संत सौ.पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून या प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या नावाखाली केले जाणारे अपप्रकार थांबविण्यासाठी यासारखे उपक्रम आवश्यक असून हिंदु जनजागृती समितीचे हे कार्य अभिनंदनीय असल्याचे मत याप्रसंगी रमेश पवार यांनी व्यक्त केले.
ध्वनीचित्रफीतीद्वारे जनजागृती
महामंडलेश्वर रामचैतन्य महाराज यांनीही या प्रदर्शनीला भेट दिली आणि उपक्रमाचे कौतूक केले. दरम्यान, प्रदर्शनी पहाण्यासाठी पहिल्याच दिवशी शेकडोच्या संख्येने गणेशभक्तांची गर्दी उसळली. गणेशोत्सव कसा असावा आणि कसा नसावा, या विषयावरील ध्वनीचित्रफित देखील या प्रदर्शनीत दाखविण्यात येत आहे. आम्हीही अशाच पध्दतीने गणेशोत्सव साजरा करू, गैरप्रकार थांबविण्यासाठी आम्हीही प्रबोधन करू, अशा प्रतिक्रिया प्रदर्शनी पहाणार्यांपैकी अनेकांनी समितीकडे व्यक्त केल्या.
सामाजिक विषयांवर फ्लेक्स
शाडू मातीची सात्विक गणेशमूर्ती हेही या प्रदर्शनातील वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सवासाठी कशी सात्विक मूर्ती स्थापन करावी, याचे प्रबोधन त्याद्वारे केले जात आहे. गणपति शास्त्र, धर्मशिक्षण, क्रांतिकारक, आचारधर्म, गायीचे महत्व, भ्रष्टाचार निर्मूलन या विषयांवरील फ्लेक्स या प्रदर्शनीत लावण्यात आलेले आहेत. रागेश्री देशपांडे, भावना कदम, भारती पंडित, डॉ.सतिश बागूल आदींनी यात सहभाग घेतला.