पुणे । शुक्रवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. राज्य तसेच परराज्यातून उत्सवाच्या कालावधीत शहारत मोठ्या संख्येने भाविक येतात. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. उत्सवाच्या कालावधीत शहरात 8 हजार पोलिसांचा खडा पहारा राहणार असून, मध्यभागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गेल्या महिनाभरापासून पोलिसांकडून गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी सुरू करण्यात आली आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
बेलबाग चौक, मंडई परिसरात मोठी गर्दी होती. या भागात महिला भाविकांचे दागिने, पर्स तसेच मोबाइल लांबवण्याचे प्रकार होतात. मध्यभागात साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत मध्य भागातील मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळांच्या परिसराची बॉम्बशोधक नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. प्रमुख मंडळांच्या मांडवांच्या परिसरात धातुशोधक यंत्रे (मेटल डिटेक्टर) बसविण्यात येणार आहेत. ध्वनिवर्धकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन मंडळांनी करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
राज्य राखीव दलाची मदत
शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहरात नोंदणीकृत 4 हजार 499 सार्वजनिक मंडळे आहेत. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, 16 उपायुक्त, 40 सहायक आयुक्त, पोलस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच 8 हजार पोलीस शिपाई बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी पोलिसांना साहाय्य करणार आहेत.