नंदुरबार । आगामी गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी अवैध्य मद्याची विक्री होणार नाही याची काळजी अधिकार्यांनी घ्यावी. पथकांची स्थापना करून शहरात व महामार्गांवर ती रोखून विक्रेता व बाळगणार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावीत याबाबतीत संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी हयगय केल्यास त्यांच्यावरच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाचा बिरसामुंडा सभागृहात गणेश मंडळ पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांनी सामाजिक भान ठेवत उत्सवा दरम्यान प्रबोधनात्मक कार्यक्रमांवर भर द्यावा. रक्तदान, आरोग्य शिबिरांचे आयोजन करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने सण साजरा करावा.
दामिनी पथकाची स्थापना
मानाचा दादा व बाबा गणपतीच्या हरिहर भेटीचा ठिकाणी गोंधळ होणार नाही यासाठी कधीकधी पोलीस बंदोबस्तासह ’ ट्रायकिंग फोर्स ’ देखील तैनात करण्यात येणार आहे. यावेळी मंडळ पदाधिकार्यांनी सोनी विहीर गाळ काढणे. महिला सुरक्षिततेसाठी सक्षम दामिनी पथकाची स्थापना करण्यात यावी. गणपती मिरवणूक मार्गाचा खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी. विजेचा पोल वरील जीर्णतारा बदलविण्यात येण्याची मागणी केली. त्यावर विभागाच्या अधिकार्यांनी समस्या सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यांची होती उपस्थिती
चर्चेत सुनील सोनार, डॉ. नरेंद्र पाटील, गजेंद्रसिंग राजपूत, दादा शिणगर ,विजय कासार, पुरुषोत्तम काळे, नरेश पवार आदींनी सहभाग घेतला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार,वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता चौहान, कार्यकारी अभियंता अनिल पाटील, राज्य उत्पादन शुल्काचे नितीन घुले, परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक प्रशांत ककरेज,पालिका मुख्याधिकारी गणेश गिरी, पोनी. संदीप रणदिवे व गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी रहावे दक्ष
स्वच्छता अभियानात सहभागी सर्वच मंडळांना प्रशस्तिपत्रके देण्यात येणार असल्याची माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे म्हणाले, सण उत्सव साजरा करत असतांना कोणाची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वाचीच आहे. कोणीही प्रक्षोभक कृत्य करणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.