गणेशोत्सव काळात ‘एड्स’ आजाराबाबत जनजागृती

0

महिंद्रा व्हेईकल्स व यश फाउंडेशनचा संयुक्तरित्या उपक्रम

चाकण : एच.आय.व्ही. (एड्स) आजाराबाबत असणारी भीती, गैरसमज, शंका-कुशंका दूर व्हाव्यात, समाजातील सर्वच घटकांचे एड्स आजाराबाबत प्रबोधन व्हावे, या उद्देशाने महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड व यश फाउंडेशन, चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या गणेशोत्सव काळात चाकण शहर व परिसरात जनजागृती करण्यात आली. विविध खेळ, घोषवाक्य स्पर्धा, चित्र प्रदर्शन, पथनाट्य, माहितीपत्रके तसेच कार्यशाळेच्या माध्यमातून एड्सबाबत जनजागृती करण्यात आली. महिंद्रा कंपनी व यश फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण खेड तालुक्यात एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

गणेशाची प्रतिष्ठापना करून श्रीगणेशा
एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्‍या व्यक्ती व बालकांसाठी यश फाउंडेशनच्या कार्यालयात सात दिवसीय गणेशाची प्रतिष्ठापना करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सातव्या दिवशी एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्‍या व्यक्ती व बालकांच्या उपस्थितीत गणपती विसर्जन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजनदेखील करण्यात आले. या कार्यक्रमांना समाजातील सर्वस्तरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

ठिकठिकाणी केली जनजागृती
गणेशोत्सवाच्या कालावधीत चाकण शहर व परिसरातील रासे, भोसे, मेदनकरवाडी, बालाजीनगर, खराबवाडी, नाणेकरवाडी, कुरुळी, निघोजे, माणिक चौक, संग्राम चौक, देशमुखआळी, महात्मा फुले चौक, मार्केट चौक, मार्केट यार्ड, धाडगे आळी, गोल्डन चौक, मशिद परिसर, आंबेठाण चौक परिसरातील गणेश मंडळांसमोर जनजागृती करण्यात आली. तसेच विविध ठिकाणी खेळांच्या माध्यमातून लोकांना सहभागी करून घेत प्रश्नोत्तरांच्या सहाय्याने त्यांना माहिती देण्यात आली. त्यामधील विजेत्यांना बक्षिसेदेखील देण्यात आली. ‘एच.आय.व्ही चे शिक्षण, करी जीवनाचे रक्षण’, ‘एड्स जाणूया, एड्स टाळूया’, ‘संयम पाळा, एड्स टाळा’, यासारखी घोषवाक्ये लावून गणेश मंडळांच्या सहकार्याने जनजागृती करण्यात आली.