मुंबई : बहुचर्चित व अत्याधुनिक वेगवान तेजस एक्सप्रेसमध्ये कोकणातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सव काळात मुंबई गोवा मार्गावर प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांना उकडीचे मोदक पुरवण्याचा निर्णय भारतीय रेल्वे कॅटरिंग प्रशासनाने घेतला आहे.
तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वांत जास्त प्रसिद्ध असलेले उकडीचे मोदक हा महाराष्ट्रीयन पदार्थ गणेशोत्सव काळात तेजसच्या मेनूमध्ये उपलब्ध असणार आहे. गणेशोत्सव काळात कोकणात मोठया संख्येने चाकरमानी प्रवास करतात. तसेच गणेशोत्सव काळात तेजसचे बुकिंगही फुल्ल झाले आहे. त्यात भारतीय रेल्वे कॅटरिंग विभाग प्रवाशांना मेनू कार्डमध्ये मोदक उपलब्ध करून देऊन कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अजून गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे.
सुरुवातीला तेजस एक्स्प्रेसमध्ये पुरवण्यात येणाऱ्या खाण्याच्या मेनूवरून प्रवाशांनी रेल्वे प्रशासन व भारतीय रेल्वे कॅटरिंग सेवेवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आयआरटीसीने कोकणातील पदार्थांचा समावेश मेनू कार्ड मध्ये केला. तसेच त्यानंतर प्रवाशांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आयआरटीसीने गणेशोत्सव काळात मेनूमध्ये मोदक उपलब्ध केला आहे. याबाबतचा प्रस्ताव असून अंतिम निर्णय झाला नाही. गणेशोत्सव काळात सुरुवातीच्या दिवसांत मोदक मेनू कार्डमध्ये उपलब्ध करून देण्याचे योजिले आहे, असे आयआरटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकिन मोरावाला यांनी सांगितले.