गणेशोत्सव जवळ आल्याने कार्यकर्त्यांची धावपळ

0
तळेगाव दाभाडे:श्री गणरायाच्या आगमनास अवघा एक आठवडा राहिला असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून सजावटी, मंडप उभारणी, आरास, विजेची रोषणाई आदी महत्वाच्या कामाकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केले असून अहोरात्र कार्यकर्ते जागरण करत आहेत. ऐतिहासिक तळेगाव शहर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शतकी परंपरा असून लोकमान्य टिऴकांनी येथील गणेशोत्सवाची स्थापना केली आहे. या शतक पूर्ण झालेल्या मंडळाकडून आकर्षक, भव्य व लोकजागृती करणारे देखावे गेली अनेक वर्ष सादर केले जातात. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शहरातील मानाच्या गणपती व इतर मंडळांकडून मंडप उभारणी, देखावे सादरीकरण, आरास, विजेची रोषणाई आदी महत्वाच्या कामाकडे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जातीने लक्ष देत आहेत. तसेच तळेगावमध्ये नेहमी मोठ्या प्रमाणात जिवंत देखावे होतात. यामध्ये सध्याच्या महत्वाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर देखाव्याचे सादरीकरण केले जाते. या देखाव्यांमधून अन्यायाविरुध्द वाचा फोडण्याचे काम, तसेच सध्याच्या घडामोडी यावर सादरीकरण करत असतात.