पुणे । पुण्याचा गणेशोत्सव डॉल्बी आणि डिजेमुक्त साजरा करावा. तसेच तो पर्यावरण पुरकही साजरा करत जगापुढे एक नवा आदर्श ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह इतर नेत्यांनी आणि पोलिस प्रशासनाने केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह पिंपरी चिंचवड दोन्ही शहरांमधील सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष-पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात झाली. या बैठकीस पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, आमदार जगदीश मुळीक, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रविंद्र कदम, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरीक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्यासह मानाच्या व इतर गणपती मंडळाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्या
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडळाचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच उत्सवाच्या काळात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कमानी उभ्या करण्यासाठी मंजुरी द्यावी, परवानगी घेण्यासाठी येणार्या कार्यकर्त्यांना पोलिस प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी, अशा प्रकाराच्या सूचना बापट यांनी पोलिस आयुक्तांना केल्या.
सूचनांचे पालन करा
उत्सव आणि कुटुंबांना सोडून पोलिस आपल्या सुरक्षेसाठी तैनात असतात. त्यामुळे त्यांचा आदर राखून मंडळांनी त्यांच्या सूचनांचे पालन करावे. पोलिस प्रशासनही पूर्णपणे मंडळांना सहकार्य करेल, अशी ग्वाही पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.
डिजेमुक्त मंडळांना 1 लाखाचे बक्षीस
मंडळांना जलद गतीने परवाने दिले जाणार आहेत. उत्सव पाहण्यासाठी महिला व मुलांना त्रास होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यावी, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. अधिकार्यांनी मडळांना सहकार्य करावे. मंडळांनीही डिजेमुक्त मिरवणूका काढून प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे महापौर काळजे यांनी केले. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी वर्षभर डिजे मुक्त कार्यक्रम घेणार्या गणेश मंडळांना यंदाच्या वर्षापासून एक लाख रुपयाचे बक्षिस देण्याची घोषणा केली.