गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करा

0
महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्यावतीने सर्व गणेश मंडळांसोबत पार पडली शांतता बैठक
महापालिका आणि पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन
भोसरी : नदी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि अन्य प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. तसेच गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्यावतीने सर्व गणेश मंडळांसोबत शांतता बैठक भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात पार पडली. या बैठकीसाठी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, नगरसेवक विलास मडीगिरी, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, सदाशिव खाडे, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विविध मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीदरम्यान सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांनी गणेश मंडळांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
अधिकृत वीजजोडणी घ्यावी
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, सर्व मंडळांनी वीजजोडणी अधिकृतपणे घ्यावी. त्यामुळे होणारे अपघात मोठ्या प्रमाणात टळतील. मिरवणुकीवेळी रस्त्यावरील झाडांच्या फांद्या आणि इलेक्ट्रिक वायर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व विसर्जन घाटांवर स्वच्छता आणि अन्य सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यासाठी प्रत्येक घाटांवर हौद बांधण्यात येत आहेत. मंडळांनी कोणत्या घाटांवर कोणत्या दिवशी विसर्जन होणार आहे, याबाबतची माहिती महापालिका प्रशासनाला द्यावी. सर्व मंडळांनी उच्च न्यायालयाचे निर्बंध पाळून गणेशोत्सव शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आवाजाची मर्यादा पाळावी
पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन म्हणाले की, प्रत्येक पक्षाने नियमांची नैतिकता पाळायला हवी. आपल्या उत्सवात निर्माण होत असलेल्या आवाजाची अडचण कुणालाही होणार नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आवाजाची मर्यादा पाळावी. प्रत्येक मंडळांनी ठराविक गणेश भक्तांना पोलीस मित्र म्हणून नेमावे. पोलीस मित्रांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला बळकटी द्यायला हवी. पोलीस प्रशासन नागरिकांसोबत मिळून शांतता ठेवण्याचे काम करणार आहे. एकमेकांच्या सहकार्याने प्रत्येक सण आणि उत्सव साजरा करण्यात येईल.
प्रशासनाने केले आवाहन 
सर्व गणेश मंडळांनी व नागरिकांनी पर्यावरणपूरक मूर्ती वापराव्यात, मुर्ती तयार करणार्‍यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीखाली लाल खूण करावी. ज्यामुळे ही मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची आहे, हे ओळखता येईल. मिरवणुकीत गुलाल किंवा अन्य रंगांचा वापर करू नये. गणेश मूर्ती कमी उंचीही व लहान आकाराची असावी. मुर्त्यांची आरास करण्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा. विद्युत रोषणाई व ध्वनी क्षेपकांचा वापर कायदेशीर व निश्‍चित केलेल्या मानकांप्रमाणे करावा. निर्माल्य निर्माल्यकुंडातच टाकावे. गणेशोत्सवादरम्यान शांतता राखण्यासाठी महापालिका कर्मचारी, होमगार्ड, आरोग्यसेवक व पोलिसांना सहकार्य करावे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. सार्वजनिक ठिकाणी ओला-सुका कचरा वेगळा टाकावा. सार्वजनिक मंडळांनी केलेले देखावे व आरास बंदिस्त नसावी. दर्शनरांग वेगळी ठेवली असली तरी देखील रांगेशिवाय मूर्तीचे दर्शन व आरास पाहता येईल याची व्यवस्था करावी. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. नदी प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जन हौदांमध्ये विसर्जन करावे.